Pune Crime News | पुणे : कुख्यात गुंड गजानण मारणे टोळीचा सदस्य आणि मोक्काच्या गुन्ह्यात फरार असलेल्याच्या पोलिसांनी आवळल्या मुसक्या
पुणे: Pune Crime News | पुणे गुन्हे शाखा युनिट 3 ने मोक्कासारख्या गंभीर गुन्ह्यात सुमारे दीड वर्षापासून फरार असलेल्या 39 वर्षीय आरोपीला जेरबंद केले आहे.
श्रीकांत ऊर्फ बाब्या संभाजी पवार (Shrikant alias Babya Sambhaji Pawar), रा. वडगाव रासाई, ता. शिरूर, जि. पुणे, असे आरोपीचे नाव आहे. पोलिसांच्या माहितीनुसार, तो गजानन मारणे टोळीशी संबंधित असून त्याच्याविरुद्ध संघटित गुन्हेगारीच्या प्रकरणात कारवाई करण्यात आली आहे.
ही कारवाई 9 सप्टेंबर 2026 रोजी करण्यात आली. कोथरूड पोलीस ठाण्यात 2025 मध्ये भारतीय न्याय संहितेतील विविध कलमे आणि महाराष्ट्र संघटित गुन्हेगारी नियंत्रण कायद्यानुसार (मोक्का) दाखल असलेल्या गंभीर गुन्ह्यात पवार पाहिजे आरोपी होता.
गोपनीय माहिती आणि तांत्रिक विश्लेषणातून ठावठिकाणा निष्पन्न
गुन्हे शाखा युनिट 3 मधील पोलीस अंमलदार अतुल साठे यांना गोपनीय बातमीदारामार्फत आरोपीच्या ठिकाणाची माहिती मिळाली.
तांत्रिक विश्लेषणानंतर पवार हा हवेली तालुक्यातील वाडे बोल्हाई येथील अपनाघर सोसायटीमध्ये आपल्या मित्रासोबत राहत असल्याची खात्रीशीर माहिती पोलिसांना मिळाली.
ही माहिती वरिष्ठ अधिकाऱ्यांना देण्यात आल्यानंतर पोलीस निरीक्षक प्रशांत अन्नछत्रे यांच्या नेतृत्वाखाली पथकाने कारवाई केली.
पोलिसांनी संबंधित घराला सर्व बाजूंनी वेढा घालत आरोपीला पळून जाण्याची कोणतीही संधी न देता घरातूनच ताब्यात घेतल्याचे सांगितले.
कायदेशीर प्रक्रिया पूर्ण केल्यानंतर पुढील तपासासाठी आरोपीला तपासी अधिकारी तथा सहायक पोलीस आयुक्त शैलेश सांखे यांच्या ताब्यात देण्यात आले.
सदरची कारवाई ही पोलीस उप-आयुक्त गौहर हसन, पोलीस आयुक्त शैलेश संखे यांच्या मार्गदर्शन व सुचनेनुसार पोलीस निरिक्षक प्रशांत अन्नछत्रे यांचे नेतृत्वाखाली सपोनि नानासाहेब कदम पोलीस अमंलदार राजेंद्र नलावडे, अतुल साठे, मोहम्मद शेख, अमित बोडरे, तुषार किंद्रे, विपुन गायकवाड, आशिष राठोड यांनी केलेली आहे.
