Pune Crime News | बनावट वैद्यकीय अहवाल देऊन विमा क्लेम मिळविण्यासाठी विमा कंपनीची आर्थिक फसवणूक केल्याप्रकरणी जीवनरेखा मल्टिस्पेशालिटी हॉस्पिटलच्या डॉक्टरांवर गुन्हा दाखल

Pune Crime News

पुणे : Pune Crime News | विमाधारकाशी संगनमत करुन असत्य व संशयास्पद वैद्यकीय अहवाल, ओळखपत्रे तयार करुन विमा कंपनीची आर्थिक फसवणुक व विश्वासघात केल्याप्रकरणी दौंड पोलिसांनी जीवनरेखा मल्टिस्पेशालिटी हॉस्पिटलच्या डॉक्टरांवर गुन्हा दाखल केला आहे.

याबाबत शाखा व्यवस्थापक अभिजित शशिकांत मोरे (वय ४३, रा. काळेबोराटेनगर, हडपसर) यांनी दौंड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यावरुन डॉ. विशाल गोविंद मिसाळ (Dr. Vishal Govind Misal), माधुरी विशाल मिसाळ (Madhuri Vishal Misal) आणि विमाधारक संकेत राजू होले Sanket Raju Hole (रा. गवळीवाडा, दौंड) यांच्यावर गुन्हा दाखल केला आहे. ही घटना दौंडमधील जीवनरेखा मल्टिस्पेशालिटी हॉस्पिटल येथे १३ जुलै २०२४ ते १९ जुलै २०२६ दरम्यान घडली.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, दौंड येथील जीवनरेखा मल्टिस्पेशालिटी हॉस्पिटलचे डॉ. विशाल मिसाळ व माधुरी मिसाळ यांनी संकेत होले यांच्याशी संगनमत केले. त्यांनी असत्य व संशयास्पद वैद्यकीय अहवाल, ओळखपत्रांचे शिक्का याचा वापर करुन विमा कंपनीची आर्थिक फसवणुक व जाणीवपूर्वक विश्वासघात करणार्‍या उद्देशाने गुन्हेगारी कट रचला. त्यांनी असत्य वैद्यकीय अहवाल व दस्तऐवज विमा कंपनीकडे सादर करुन कंपनीची आर्थिक फसवणुक केली आहे.

बजाज विमा कंपनीच्या शाखा व्यवस्थापकाने सध्या तरी एका विमा क्लेमबाबत तक्रार दिली असून पोलीस हवालदार अमीर शेख तपास करीत आहेत.

You may have missed