Pune Crime News | आठ दिवसांच्या बोलीवर घेतले 23 लाख, नातेवाईकांमध्ये बदनामी केल्याने तब्बल 20 लाख परत देण्यास नकार देणार्‍या महिलेवर गुन्हा दाखल

Pune Crime News

पुणे : Pune Crime News | व्यवसायानिमित्त ओळख झाल्यानंतर ८ दिवसांच्या बोलीवर तिने २३ लाख ६९ हजार रुपये घेतले. त्यातील केवळ ३ लाख  २० हजार रुपये परत केले. पैसे देत नसल्याने नातेवाईकांमध्ये बदनामी केल्याचे सांगत खोटा गुन्हा दाखल करण्याची धमकी दिली. तब्बल २ वर्ष उरलेले २० लाख रुपये देण्यास नकार देणार्‍या महिलेवर फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

याबाबत संतोष दशरथ बोराडे (वय ३९, रा. साईश्रद्धा पॅलेस, टिळेकरनगर, कोंढवा) यांनी फरासखाना पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यावरुन पोलिसांनी प्रियंका योगेश विघावे (वय ४०, रा. मंगळवार पेठ) यांच्यावर गुन्हा दाखल केला आहे. ही घटना कसबा पेठेतील किनारा सोसायटीत ६ जून ते १४ जुलै २०२४ दरम्यान घडली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी यांची नाई एंटरप्रायजेस नावाची कंन्स्ट्रक्शन कंपनी आहे. त्याद्वारे ते पी डब्ल्यु डी व एम एम आर डी ए यांची कामे घेऊन करत असतात. टिळेकरनगर येथील प्लॉट विक्री दरम्यान त्यांची प्रियंका विघावे यांच्याशी ओळख झाली होती. त्यानंतर त्यांनी एकमेकांना वैयक्तिक अडचण असल्यास वारंवार पैशांची देवाण घेवाण करत होते. ६ जून २०२४ रोजी प्रियंका विघावे हिने पैशांची गरज असून सात ते आठ दिवसांमध्ये पैसे परत करण्याची हमी दिली. त्यानंतर त्यांनी १० ते १५ दिवसात  त्यांनी २३ लाख ६९ हजार ६०० रुपये दिले. काही दिवसांनी पैसे परत मागितल्यावर प्रियंका विघावे यांनी पैसे देण्यास टाळाटाळ केली. वारंवार मागणी केल्यावर त्यांनी ३ लाख २० हजार ४९५ रुपये परत केले. उरलेले २० लाख ४९ हजार १०५ रुपये परत केले नाही. 

फिर्यादी यांचा फोन उचलत नसल्याने त्यांनी त्यांची आई तसेच इतर नातेवाईकांना भेटून प्रियंका विघावे यांना दिलेले पैसे माघारी देण्यास सांगितले. त्यावर प्रियंका विघावे हिने फिर्यादी यांना फोन करुन ‘‘तु माझी नातेवाईकांकडे इज्जत घालवलीस, मी तुझ्यावर खोटा गुन्हा दाखल करेल, आता तुझे पैसे मी देत नाही. तुला काय करायचे ते कर,’’ असे म्हणून फोन बंद केला. त्यानंतर त्यांनी बराच काळ त्या पैसे देतील, असे म्हणून वाट पाहिली. आपली फसवणूक झाल्याचे लक्षात आल्यावर त्यांनी आता फिर्याद दिली आहे. सहायक पोलीस निरीक्षक सुरवसे तपास करीत आहेत.

You may have missed