Pune Crime News | खडकवासला परिसरात भरधाव टेम्पोची दुचाकीला धडक; 26 वर्षीय तरुणाचा मृत्यू
पुणे : Pune Crime News | भरधाव टेम्पोने दुचाकीला दिलेल्या धडकेत 26 वर्षीय तरुणाचा मृत्यू झाल्याची घटना खडकवासला परिसरात घडली. अपघातानंतर टेम्पोचालक घटनास्थळी न थांबता पसार झाला. या प्रकरणी नांदेड सिटी पोलिसांनी टेम्पोचालकाविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.
कलफ शाबीर हुसेन (वय 26, सध्या रा. न्यू कोपरे गाव, एनडीए रस्ता) असे मृत्यू झालेल्या तरुणाचे नाव आहे. याबाबत हुसेन यांचा पुतण्या मोहम्मद गोली साह (वय 19, सध्या रा. तळेगाव दाभाडे; मूळ रा. रन्नुडी लालपूर, जि. बलरामपूर, उत्तर प्रदेश) यांनी नांदेड सिटी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, हुसेन हे 8 ऑगस्ट रोजी दुपारी साडेतीनच्या सुमारास दुचाकीवरून खडकवासला परिसरातून जात होते. डीआयटी संस्थेच्या प्रवेशद्वारासमोर भरधाव टेम्पोने त्यांच्या दुचाकीला जोरदार धडक दिली.
या अपघातात हुसेन गंभीर जखमी झाले. मात्र, अपघातानंतर टेम्पोचालकाने घटनास्थळी न थांबता पलायन केले. गंभीर जखमी झालेल्या हुसेन यांचा उपचार सुरू होण्यापूर्वीच मृत्यू झाला.
या प्रकरणाचा पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक गणेश कसबे करीत आहेत.
