Pune Crime News | गुंतवणुकीवर जादा परतावा देण्याचे आमिष दाखवून 35 लाखांचा गंडा घालणाऱ्या राजीव गांधी रुग्णालयातील परिचारिका स्टेला तायडे यांच्यासह पती, मुलगा, मुलीवर गुन्हा दाखल

Pune Crime News

पुणे : Pune Crime News | गुंतवणुकीवर जादा परतावा देण्याचे आमिष दाखवून राजीव गांधी रुग्णालयातील परिचारिका हिने रुग्णालयातील कर्मचाऱ्यांची ३५ लाखांची फसवणूक करणाऱ्या परिचारिका व तिच्या कुटुंबावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

स्टेला संतोष तायडे (Stella Santosh Tayade), संतोष अंकुश तायडे (Santosh Ankush Tayade), जॉय संतोष तायडे (Joy Santosh Tayade),  एंजेल संतोष तायडे Angel Santosh Tayade (सर्व रा. गुलमोहर सोसायटी, बकोरी फाटा, वाघोली) अशी गुन्हा दाखल केलेल्यांची नावे आहेत.

हा प्रकार जून २०२४ ते जुलै २०२५ दरम्यान घडला आहे. एका महिलेने लक्ष्मीनगर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, स्टेला तायडे या राजीव गांधी रुग्णालयात परिचारिका म्हणून काम करतात.  त्यांनी रुग्णालयात काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांना आम्ही कंपन्यांमध्ये, बँकेत गुंतवणूक करतो. आमच्याकडे गुंतवणूक केल्यास जादा परतावा देऊ. असे आमिष दाखवले. फिर्यादी व इतरांचा विश्वास संपादन केला. त्यांच्याकडून ३५ लाख २४ हजार २५० रुपये घेतले. गुंतवणूक केल्यानंतर वर्ष झाल्यावर या कर्मचाऱ्यांनी परतावा देण्याची मागणी केली. तेव्हा सुरुवातीला त्यांनी टाळाटाळ केली.

फिर्यादी व त्यांच्या सहकाऱ्यांनी वारंवार पैसे मागितल्यावर स्टेला तायडे हिचा पती संतोष तायडे, मुलगा जॉय व मुलगी एंजेल तायडे यांनी त्यांना शिवीगाळ करून दमदाटी केली. तेव्हा फिर्यादी यांनी पोलिसात तक्रार करणार असल्याचे सांगितले. त्यावर स्टेला तायडे हिने पोलिसात तक्रार केल्यास गुंतवणुकीची रक्कम परत देणार नाही व तुम्हाला बघून घेईल. नाही तर माझ्या जीवाचे बरे वाईट करून घेईन, अशी धमकी दिली आहे. त्यामुळे फिर्यादी या काही काळ गप्प राहिल्या. तरीही पैसे न दिल्याने त्यांनी शेवटी लक्ष्मीनगर पोलिसांकडे तक्रार दिली. सहायक पोलीस निरीक्षक लिंगाडे यांनी सांगितले की आमच्याकडे आतापर्यंत ७ ते ८ जणांनी फसवणुकीची तक्रार दिली आहे. तायडे कुटुंबाने आणखी काही जणांची फसवणूक केली असल्याची शक्यता आहे.

You may have missed