Pune Crime News | शेअर बाजारात मोठ्या परताव्याचे आमिष; पुण्यात ज्येष्ठ नागरिकाची 18.60 लाखांची फसवणूक
पुणे: Pune Crime News | शेअर बाजारात गुंतवणूक केल्यास मोठा परतावा मिळेल, असे आमिष दाखवून कोथरूड परिसरातील एका ६० वर्षीय सेवानिवृत्त ज्येष्ठ नागरिकाची १८ लाख ६० हजार रुपयांची फसवणूक करण्यात आल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. याप्रकरणी अलंकार पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, तक्रारदार हे कोथरूड भागात वास्तव्यास असून सेवानिवृत्त आहेत. जून महिन्यात त्यांनी सोशल मीडियावर शेअर बाजारातील गुंतवणुकीसंदर्भातील एक जाहिरात पाहिली होती. या जाहिरातीत शेअर बाजारात गुंतवणूक केल्यास चांगला परतावा मिळेल, असे सांगण्यात आले होते.
जाहिरातीवर विश्वास ठेवून तक्रारदारांनी त्यामध्ये दिलेल्या मोबाइल क्रमांकावर संपर्क साधला. त्यानंतर संबंधित सायबर चोरट्याने त्यांना शेअर बाजारात गुंतवणूक करण्यास प्रवृत्त केले आणि मोठ्या नफ्याचे आमिष दाखवले.
सायबर चोरट्याच्या सांगण्यावर विश्वास ठेवून ज्येष्ठ नागरिकाने टप्प्याटप्प्याने एकूण १८ लाख ६० हजार रुपये गुंतवले. मात्र, गुंतवणुकीनंतर अपेक्षित परतावा मिळाला नाही. एवढेच नव्हे, तर त्यांनी गुंतवलेली मूळ रक्कमही परत मिळाली नाही.
फसवणूक झाल्याचे लक्षात आल्यानंतर ज्येष्ठ नागरिकाने पोलिसांकडे धाव घेत तक्रार नोंदवली. या प्रकरणाचा पुढील तपास गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक पाटील करत आहेत.
