Pune Crime News | औषध वितरकाकडून औषधे घेऊन फसवणूक करणार्या सोनाली गिरीगोसावी, जयेश जैन यांच्यावर आणखी एक गुन्हा दाखल
पुणे : Pune Crime News | सदाशिव पेठेतील औषध वितरकांकडून लाखो रुपयांची उधारीवर औषधे घेऊन त्यांची फसवणूक करणार्या दोघांवर विश्रामबाग पोलीस ठाण्यात फसवणुकीचा आणखी एक गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
सोनाली लक्ष्मण गिरीगोसावी Sonali Laxman Girigosavi (वय ४२, रा. अर्चना कोहिनूर ग्लोरी सोसायटी, महंमदवाडी) आणि जयेश वसंत जैन Jayesh Vasant Jain (वय ४१, रा. भक्तीपुजा अपार्टमेंट, महर्षीनगर, गुलटेकडी) अशी गुन्हा दाखल झालेल्यांची नावे आहेत. याबाबत टोनी अॅन्थोनी फर्नाडिस (वय ७३, रा. कॅम्प) यांनी विश्रामबाग पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. हा प्रकार सदाशिव पेठेतील मीना फार्मा येथील दुकानात ६ मार्च २०२५ ते ३ मे २०२५ दरम्यान घडला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सोनाली गिरीगोसावी या सदाशिव पेठेतील घाऊक औषध वितरकांकडून सुरुवातीला आपल्या दुकानासाठी औषधे खरेदी करुन त्याचे पैसे देऊन त्यांचा विश्वास संपादन करत. त्यानंतर उधारीवर माल खरेदी करण्यास सुरुवात करत. त्याचे काहीचे पैसे वेळेवर देत. त्यानंतर जयेश जैन हा मोठमोठ्या संस्थांना औषधे वितरण करतो. त्याला माझ्याप्रमाणे उधारीवर माल द्यावा. त्याचे बिल मी देईन असे सांगत. वितरकाकडून जयेश जैन कोट्यावधीचा माल उचलत. त्यानंतर त्यांना पैसे न देता त्यांची फसवणूक करत आहेत. २०२४ पासून त्यांनी हा प्रकार सुरु केल्याचे यापूर्वी दाखल झालेल्या गुन्ह्यामधून दिसून आले आहे. त्यांच्यावर आतापर्यंत १८ कोटी रुपयांची फसवणूक केल्याचे गुन्हे दाखल असून त्याचा तपास आर्थिक गुन्हे शाखेकडे देण्यात आला आहे.
फिर्यादी टोनी फर्नाडिस यांची सदाशिव पेठेत मीना फार्मा हे घाऊक औषध विक्रीचे दुकान आहे. त्यांचा विश्वास संपादन करुन त्यांच्याकडून ६२ लाख ९९ हजार ४४ रुपयांची औषधे खरेदी केली. त्यांचे पैसे न देता फिर्यादी यांची आर्थिक फसवणूक केली आहे. सहायक पोलीस निरीक्षक विकास अडागळे तपास करीत आहेत.
