Pune Crime News | अर्धांगवायू झालेल्या मामाचा त्रास सहन न होऊन भाच्याने मामाचा खुन करुन स्वत: गळफास घेऊन केली आत्महत्या

Pune Crime News

पुणे : Pune Crime News | शोरुममध्ये नोकरी लागणार असताना आयुष्याची नवी सुरुवात करण्यासाठी भाचा आईला घेऊन जात होता. आईचे आधार कार्ड घेण्यासाठी तो घरी आला. अर्धांगवायुचा झटका आल्याने गेले २ महिने घरात असलेल्या मामाचा त्रास असहय झाल्याने घरी आलेल्या भाच्याने मामाच्या मानेवर कोयत्याने वार करुन त्याचा खुन केला व स्वत: गळफास घेऊन आत्महत्या केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे.

संदीप वामन गडदे (वय ४८, रा. शिवे वाघाव, ता. खेड) असे खुन झालेल्या मामाचे नाव आहे. तर प्रविण कैलास कोहीनकर (वय २०, रा. आरुडे गॅरेजच्या पाठीमागे, कोहीनकरवाडी रोड, सातकरस्थळ, ता. खेड) असे आत्महत्या केलेल्या तरुणाचे नाव आहे. याबाबत त्याची आई सविता कैलास कोहीनकर (वय ४६) यांनी खेड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. ही घटना त्यांच्या राहत्या घरी शनिवारी सकाळी नऊ ते साडेबारा वाजण्याच्या दरम्यान घडली.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी या मुलगा अभिषेक व प्रविण कोहीनकर तसेच भाऊ संदीप वामन गडदे यांच्यासह राहतात. संदीप गडदे यांना अर्धांग वायूचा झटका आल्याने त्यांचा डावा पाय व डाव्या हाताला जीव नव्हता. त्यामुळे त्यांना चालता व उठता येत नव्हते. गेल्या २ महिन्यांपासून त्यांना फिर्यादी यांच्या घरी आणले आहे. अर्धांग वायूचा आजार झाल्याने तो अचानक झोपेतुन उठून मोठमोठ्याने आरडा ओरडा करीत होता. त्यातून चिडचिड करुन त्यांना सर्वांना त्रास देत होता. शनिवारी १९ सप्टेंबर रोजी सकाळी अभिषेक हा कामाला गेला. त्यांचा लहान मुलगा प्रविण याला शोरुममध्ये नोकरी लागणार होती. त्या ठिकाणी आईचा अंगठा लागणार असल्याने तो मोटारसायकलवरुन आईला घेऊन वाकी येथे सकाळी ९ वाजता आला. प्रविण याने एका हॉटेलजवळ आईला थांबविले. आईला विचारले की तुझे आधार कार्ड आणले का, त्यावर त्यांनी नाही म्हटले.

त्यांना तेथेच थांबवुन तो आधार कार्ड घेऊन येण्यास परत घरी गेला. २ ते ३ तास वाट पाहूनही प्रविण न आल्याने त्या चालत चालत घरी येत होत्या. तेव्हा वाटेत अभिषेक याचा मित्र त्यांना घेण्यास आला. ते घरी आले. तेव्हा दरवाजा आतून बंद होता. आवाज दिल्यानंतरही दरवाजा न उघडल्याने त्यांनी घराच्या  खिडकीतून आत पाहिले असता प्रविण याने घराच्या बेडरुमच्या  फॅनच्या  हुकाला साडीने गळफास घेतल्याचे दिसून आले. हे पाहून त्यांचा आरडाओरडा ऐकून लोक जमा झाले. लोकांनी दरवाजा तोडून आत प्रवेश केला. घरात संदीप गडदे हा बेडरुममध्ये पडलेला होता. त्याच्या मानेवर व डाव्या हाताचे पंजाचे मागील बाजूस बोटावर, डोक्यात जखम होऊन रक्त येत होते. तेथेच कोयता पडलेला होता. प्रविण याने गळफास घेतला होता. दोघांना घेऊन चांडोली रुग्णालयात नेले असता डॉक्टरांनी दोघेही मृत्यू पावल्याचे सांगितले. मामाच्या त्रासाला कंटाळून भाच्याने कोयत्याने वार करुन मामाचा खुन केला. त्यानंतर भाच्याने गळफास घेऊन आत्महत्या केल्याचे निष्पन्न झाले. पोलीस उपनिरीक्षक अभिजित कुदळे तपास करीत आहेत.

You may have missed