Pune Crime News | 4427 कोटी रुपये परदेशात पाठवून शासनाचा कर चुकविल्याच्या आरोपावरुन चार्टर्ड अकाऊंटंट फर्मचे संचालक अंकुशकुमार बगरेचा आणि मोहित तोडी यांच्यावर गुन्हा दाखल
पुणे : Pune Crime News | परदेशात पैसे पाठविण्यासाठी आवश्यक कागदपत्रांची पडताळणी न करता ३ कंपन्यांसाठी खोटे प्रमाणपत्र तयार करुन ४४२७ कोटी ९२ लाख ४४ हजार ४०८ रुपये परदेशात पाठवून शासनाचा कर चुकवून फसवणुक केल्याच्या आरोपावरुन एम एस ओडी अँड असोसिएटस या फर्मच्या दोघा संचालकांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
अंकुशकुमार सुरेशचंद बगरेचा Ankushkumar Sureshchand Bagrecha (वय ३४, रा. आचलनगर, कोंढवा), मोहित शिवकुमार तोडी Mohit Shivkumar Todi (वय ३३, रा. कोंढवा) अशी गुन्हा दाखल झालेल्यांची नावे आहेत. याबाबत आयकर विभागाच्या सहायक संचालक तन्मयी सुहास देसाई (वय ३१, रा. निगडी प्राधिकरण) यांनी कोंढवा येवलेवाडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. हा प्रकार एम एस ओडी अँड असोसिएटसच्या कात्रज कोंढवा रोडवरील शिव समृद्धी आर्केड येथील कार्यालयात २०२२ ते २०२६ दरम्यान घडला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, अंकुश बगरेचा आणि मोहित तोडी हे चार्टड अकाऊंटट आहेत. त्यांची एम एस ओडी अँड असोसिएटस नावाची फर्म आहे. परदेशात पैसे पाठविताना फॉर्म १५ सी बी भरावा लागतो. सीए पैशांचा स्त्रोत आणि टीडीएस दर तपासतात. या दोघांनी व इतरांनी आप आपसात संगनमत करुन त्यांच्याकडील प्राप्त शेल/ बोगस कंपनीचे कुठल्याही प्रकारचे व्यवहाराचे कागदपत्र सादर केली नाही. आर्थिक वर्ष २०२२-२३, सन २०२३- २४, सन २०२४ – २५ आणि २०२५ – २६ या मध्ये परदेशी चलन पाठविण्यासाठी आवश्यक असणारे फॉर्म १५ सी बी प्रमाणपत्र कुठल्याही कागदपत्रांची पडताळणी न करता खोटे प्रमाणपत्र तयार करुन ते खरे असल्याचे भासवुन आयकर विभागाला सादर केले. तसेच फॉर्म १५ सी ए प्रमाणपत्र हे त्यांना तयार करण्याचा अधिकार नसताना त्यांनी ते बेकायदेशीररित्या तयार करुन पोर्टलवर सादर केले.
फसवणुकीच्या उद्देशाने त्यांनी ३ कंपन्यांचे फायद्यासाठी ४ आर्थिक वर्षात एकूण ४४२७ कोटी ९२ लाख ४४ हजार ४०८ पाठवून या रक्कमे संदर्भात शासनाचा कर चुकवुन शासनाची फसवणूक केल्याचा आरोप फिर्यादीमध्ये करण्यात आला आहे. आयकर विभागाने याबाबत आर्थिक गुन्हे शाखेकडे तक्रार अर्ज दिला होता. त्यावरुन कोंढवा येवलेवाडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत आर्थिक गुन्हे शाखेचे पोलीस उपायुक्त विवेक मासाळ यांनी सांगितले की, आयकर विभागाकडून हा तक्रार अर्ज आला होता. त्या अनुषंगाने गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आयकर विभागाकडून अजूनही तपास सुरु आहे. त्यांच्याकडून तांत्रिक माहिती घेण्यात येत आहे.
