Pune Crime News | गाडीचे लोन करुन देण्यासाठी कागदपत्रे घेऊन महिलेची फसवणूक करणार्या दोघांना खडकी पोलिसांनी केली अटक
पुणे : Pune Crime News | मुलाला दुचाकी घेण्यासाठी कर्ज मिळवुन देतो, असे सांगून कागदपत्रे घेऊन त्याआधारे ८३ हजार रुपयांचा मोबाईल खरेदी करुन महिलेची फसवणूक केल्याच्या आरोपातून खडकी पोलिसांनी दोघांना अटक केली आहे.
यश प्रमोद पगारे Yash Pramod Pagare (वय २०, रा. अशोक सम्राट नगर, गोयल चाळ, बोपोडी) आणि अल्ताफ हजरत मुजावर Altaf Hazrat Mujawar (वय २६, रा. मदर टेरेसानगर, गाडीतळ, येरवडा) अशी अटक केलेल्यांची नावे आहेत. याबाबत जया अरविंद अडसुळ (वय ३७, रा. मुळा हाऊस, खडकी) यांनी खडकी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे़ हा प्रकार ४ जून २०२६ पासून आजपर्यंत घडला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी या आर्मी अधिकार्यांच्या बंगल्यामध्ये काम करतात. त्यांच्या मुलाला दुचाकी गाडी घ्यायची होती. यश पगारे हा पूर्वी एका फायनान्स कंपनीत कामाला होता. त्यामुळे त्याला वाहन कर्जाविषयी माहिती होती. त्याने फिर्यादी यांना वाहनकर्ज करुन देतो, असे सांगून त्यांच्याकडून आधार कार्ड, पॅन कार्ड व बँक पासबुकची सॉफ्ट कॉपी व्हाटसअॅपवर मागणी करुन घेतली. ही कागदपत्रे त्याने अल्ताफ मुजावर याला दिली. मुजावर याने या कागदपत्राचा वापर करुन फिर्यादी यांच्या नावावर ८३ हजार रुपयांचा मोबाईल खरेदी केला. हे फिर्यादी यांना समजल्यावर अल्ताफ मुजावर याने त्यांना ४० हजार रुपये देतो, असे सांगून मोबाईल घेऊन गेला. मोबाईल व पैसे परत न करता त्यांची फसवणूक केली. खडकी पोलिसांनी दोघांना अटक केली असून अधिक तपासासाठी न्यायालयाने २१ सप्टेंबरपर्यंत पोलीस कोठडी मंजूर केली आहे. सहायक पोलीस निरीक्षक मुद्दसर पटेल तपास करीत आहेत.
