Pune Ganeshotsav | पुणे : मुख्य गणेश विसर्जन मार्गावरील पदपथांची दुरवस्था; भाविकांसाठी खडतर वाट, पालिकेच्या कारभारावर प्रश्न
पुणे : Pune Ganeshotsav | गणेशोत्सवाच्या मुख्य विसर्जन मिरवणुकीपूर्वी शहरातील रस्ते चकाचक करण्यासाठी पुणे महापालिकेची लगबग सुरू असली, तरी प्रमुख विसर्जन मार्गांवरील पदपथांची दुरवस्था कायम असल्याचे दिसून येत आहे. अनेक ठिकाणी पेव्हर ब्लॉक उखडले असून काही पदपथ तुटलेल्या अवस्थेत आहेत.
पदपथ चालण्यायोग्य नसल्याने नागरिकांना थेट रस्त्यावरून चालावे लागत आहे. गणेशोत्सवाच्या काळात मोठ्या प्रमाणावर होणारी गर्दी आणि वाहनांची वर्दळ लक्षात घेता पादचाऱ्यांच्या सुरक्षिततेचा प्रश्न निर्माण झाला आहे.
गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर महापालिकेने शहरातील रस्त्यांवरील खड्डे बुजविण्याची मोहीम हाती घेतली आहे. अनेक ठिकाणी रस्त्यांची कामे पूर्ण करण्यात आली असली, तरी पदपथांच्या दुरुस्तीकडे पुरेसे लक्ष दिले जात नसल्याची नागरिकांची तक्रार आहे.
मुख्य विसर्जन मार्गातील बाजीराव रस्त्यावर अनेक ठिकाणी पदपथांची अवस्था खराब आहे. विशेषतः नूमवि शाळेसमोरील पदपथासह परिसरातील अनेक ठिकाणी पेव्हर ब्लॉक उखडले आहेत.
त्यामुळे ज्येष्ठ नागरिक, महिला आणि लहान मुलांना वाहनांच्या वर्दळीतून रस्त्यावरून वाट काढावी लागत आहे.
अनंत चतुर्दशीच्या मुख्य विसर्जन मिरवणुकीसाठी पुणे शहरासह राज्याच्या विविध भागांतून मोठ्या संख्येने भाविक आणि नागरिक या मार्गांवर दाखल होतात. अशा परिस्थितीत पदपथ चालण्यायोग्य नसल्यास गर्दीचे व्यवस्थापन आणि नागरिकांच्या सुरक्षिततेवर परिणाम होण्याची भीती व्यक्त केली जात आहे.
या संदर्भात पुणे महापालिकेचे अतिरिक्त आयुक्त ओमप्रकाश दिवटे यांनी सांगितले की, मध्यवर्ती पेठांसह विसर्जन मार्गावरील रस्त्यांवरील खड्डे बुजविण्यात आले असून पदपथांच्या दुरुस्तीचे कामही वेगाने सुरू आहे.
क्षेत्रीय कार्यालय स्तरावर काही कामे योग्य पद्धतीने झालेली नसल्याचे निदर्शनास आले असून त्यांचा आढावा घेऊन संबंधितांना आवश्यक सूचना देण्यात आल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
नूमवि शाळेजवळ विद्युत विभागाच्या खोदकामामुळे पदपथ खराब झाला होता. त्याची तातडीने दुरुस्ती करण्यात आली असून इतर ठिकाणच्या पदपथांच्या दुरुस्तीसाठीही तातडीने कार्यवाही करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत.
मुख्य विसर्जन मिरवणुकीपूर्वी मिरवणूक मार्गावरील सर्व पदपथ सुस्थितीत आणले जातील, असे महापालिका प्रशासनाने स्पष्ट केले आहे.
