Pune Ganeshotsav | पुणे : मुख्य गणेश विसर्जन मिरवणुकीत 150 मंडळांना ‘नो एन्ट्री’; मनपा आणि पोलिसांच्या उच्चस्तरीय बैठकीत निर्णय
पुणे : Pune Ganeshotsav | पुण्यातील मुख्य गणेश विसर्जन मिरवणुकीचा कालावधी कमी करण्यासाठी पोलिस प्रशासनाने यंदा सुमारे 150 गणेश मंडळांना मुख्य विसर्जन मिरवणुकीत प्रवेश न देण्याचा निर्णय घेतला आहे.
गेल्या दोन वर्षांत तात्पुरत्या स्वरूपात मुख्य विसर्जन मिरवणुकीत सहभागी होण्याची परवानगी देण्यात आलेल्या मंडळांना यंदा मात्र परवानगी नाकारण्यात आली आहे. पुणे महापालिका आणि पोलिस प्रशासनाच्या उच्चस्तरीय बैठकीत हा धोरणात्मक निर्णय घेण्यात आल्याची माहिती आहे.
परिमंडळ-1 चे पोलिस उपायुक्त कृषिकेश रावले यांनी संबंधित गणेश मंडळांना पत्र पाठवून या निर्णयाची माहिती दिली आहे.
गेल्या तीन ते चार वर्षांत शहरातील विविध भागांतील सुमारे 150 मंडळांनी विशेष परवानगी घेऊन मुख्य विसर्जन मिरवणूक मार्गावर प्रवेश मिळवला होता. लक्ष्मी रस्ता, टिळक रस्ता, कुमठेकर रस्ता आणि केळकर रस्ता या चार प्रमुख मार्गांवरून मोठ्या संख्येने गणेश मंडळे विसर्जन मिरवणुकीत सहभागी होतात.
2022 मध्ये या प्रमुख मार्गांवरून 608 मंडळांनी विसर्जन मिरवणूक काढली होती, तर 2023 मध्ये ही संख्या वाढून 1,015 मंडळांपर्यंत पोहोचली होती. यंदा पुणे शहरातील सार्वजनिक गणेश मंडळांची संख्या सुमारे 4,170 झाली आहे.
2025 मध्ये पुण्यातील मुख्य गणेश विसर्जन मिरवणूक पूर्ण होण्यासाठी 32 तास 26 मिनिटे लागली होती, तर अखेरच्या गणेशमूर्तीच्या विसर्जनापर्यंत संपूर्ण प्रक्रिया जवळपास 34 तास चालली होती.
मंडळांकडून मार्गावर घेतले जाणारे थांबे, वाढती गर्दी, ढोल-ताशा पथके तसेच मिरवणूक मार्गावरील विविध अडथळ्यांमुळे विसर्जनाचा कालावधी वाढत असल्याचे पोलिस प्रशासनाच्या निदर्शनास आले आहे.
त्यामुळे यंदा मुख्य विसर्जन मिरवणूक अधिक सुरळीत करण्यासाठी, गर्दीचे प्रभावी व्यवस्थापन करण्यासाठी आणि मिरवणुकीचा एकूण कालावधी कमी करण्यासाठी सहभागी गणेश मंडळांची संख्या नियंत्रित करण्याचा निर्णय पोलिसांनी घेतला आहे.
