Pune Festival 2026 | पुणे फेस्टिव्हलमध्ये व्यंगचित्रांचा रंगतदार मेळा; 110 हून अधिक कलाकारांची 300 चित्रे प्रदर्शनात

Pune Festival 2026 | A vibrant gathering of cartoons at the Pune Festival; 300 artworks by over 110 artists on display.

पुणे फेस्टिव्हलचे अध्यक्ष कृष्णकुमार गोयल म्हणाले – “सत्ताधारी आणि राजकारण्यांवर अंकुश ठेवण्याचे महत्त्वाचे काम व्यंगचित्रकारांच्या रेषा करतात.”

पुणे : Pune Festival 2026 | पुणे फेस्टिव्हलअंतर्गत महाराष्ट्रातील व्यंगचित्रकारांच्या ‘कार्टुनिस्ट कॅफे क्लब’ या संस्थेतर्फे आयोजित करण्यात आलेल्या भव्य व्यंगचित्र प्रदर्शनाचे उद्घाटन बालगंधर्व कलादालन येथे झाले. राज्यातील 110 हून अधिक व्यंगचित्रकारांनी रेखाटलेली 300 पेक्षा अधिक रंगीत व्यंगचित्रे या प्रदर्शनात मांडण्यात आली आहेत.

प्रदर्शनाचे उद्घाटन ‘सकाळ’ माध्यम समूहाचे मुख्य संपादक निलेश खरे यांच्या हस्ते झाले. विशेष म्हणजे, त्यांनी स्वतः गणपतीचे चित्र रेखाटून प्रदर्शनाचे अनोख्या पद्धतीने उद्घाटन केले. ज्येष्ठ व्यंगचित्रकार संजय मिस्त्री आणि ‘लोकसत्ता’चे व्यंगचित्रकार प्रशांत कुलकर्णी हे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते.

प्रदर्शनातील व्यंगचित्रे प्रामुख्याने 12 बाय 18 इंच आकारात असून सामाजिक, राजकीय आणि विविध समकालीन विषयांवर भाष्य करणाऱ्या कलाकृतींचा त्यात समावेश आहे.

कार्यक्रमाच्या प्रारंभी पुणे फेस्टिव्हलचे अध्यक्ष कृष्णकुमार गोयल यांनी उपस्थितांचे स्वागत केले. ते म्हणाले, “सत्ताधारी आणि राजकारण्यांवर अंकुश ठेवण्याचे महत्त्वाचे काम व्यंगचित्रकारांच्या रेषा करतात.”

उद्घाटक निलेश खरे यांनी चित्र आणि शब्द या दोन्ही माध्यमांच्या प्रभावी ताकदीवर भाष्य केले. समाजातील विविध प्रश्नांकडे लक्ष वेधण्यासाठी अनेकदा मोर्चे आणि निदर्शने करावी लागतात; मात्र व्यंगचित्रकार केवळ काही प्रभावी रेषांच्या माध्यमातून तेच काम करू शकतात, असे त्यांनी सांगितले.

यावेळी ज्येष्ठ व्यंगचित्रकार संजय मिस्त्री तसेच सांस्कृतिक कार्यक्रमाचे मुख्य संयोजक डॉ. सतीश देसाई यांनीही आपले मनोगत व्यक्त केले.

कार्यक्रमाला व्यंगचित्रकार चारुहास पंडित, योगेंद्र भगत, शरयू फरकांडे, संदेश चव्हाण, सुहास पालीमकर, जगदीश कुलकर्णी, उमेश कवळे आणि विवेक प्रभूकेळूस्कर यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते. व्यंगचित्रकार विश्वास सूर्यवंशी यांनी आभार मानले.

दोन दिवस प्रदर्शन सर्वांसाठी खुले

हे प्रदर्शन सोमवार, 21 सप्टेंबर आणि मंगळवार, 22 सप्टेंबर असे दोन दिवस बालगंधर्व कलादालन येथे सकाळी 10 ते रात्री 8 वाजेपर्यंत सर्वांसाठी खुले राहणार आहे.

प्रदर्शनात सहभागी 110 हून अधिक व्यंगचित्रकारांमध्ये 10 महिला व्यंगचित्रकारांचाही सहभाग आहे.

मंगळवार, 22 सप्टेंबर रोजी बालगंधर्व कलादालनात व्यंगचित्रांची प्रत्यक्ष प्रात्यक्षिके आणि विविध विषयांवरील व्याख्यानेही आयोजित करण्यात आली आहेत.

यावेळी समन्वयक सचिन आडेकर, प्रमोद उमरदंड, आबा जगताप, अन्वर शेख यांच्यासह मोठ्या संख्येने कलाप्रेमी उपस्थित होते.

You may have missed