Pune Weather Updates | पुण्यात सकाळी गारवा, दुपारी उन्हाचा चटका; थंडीची चाहूल लागली, पण उकाडा कायम
पुणे : Pune Weather Updates | वातावरणातील बदलांमुळे पुणे शहरात गेल्या दोन दिवसांपासून सकाळच्या वेळी गारवा वाढला आहे. सकाळी नऊ वाजेपर्यंत आल्हाददायक वातावरण अनुभवायला मिळत असले, तरी दुपारच्या उन्हाचा चटका आणि उकाडा मात्र कायम आहे.
नोव्हेंबर महिन्याला सुरुवात झाल्याने पुणेकरांना आता हिवाळ्याची चाहूल लागू लागली आहे. गेल्या आठवड्यात किमान तापमानात लक्षणीय घट झाली होती. याच काळात हंगामातील नीचांकी तापमानाची नोंद झाली. मात्र, कमाल तापमानात फारसा बदल झालेला नाही.
त्यामुळे शहरात सकाळी थंड हवा, दुपारी उन्हाचा चटका आणि सायंकाळी ढगाळ वातावरण असे संमिश्र हवामान अनुभवायला मिळत आहे.
बुधवारी सकाळी वातावरणात सुखद गारवा जाणवत होता. दुपारी काही वेळ तीव्र ऊन पडले, तर अधूनमधून आकाश ढगाळ झाले होते. सायंकाळनंतर उकाड्याची तीव्रता काहीशी कमी झाली.
बुधवारी पुण्यात कमाल तापमान ३२.७ अंश सेल्सिअस, तर किमान तापमान १९.९ अंश सेल्सिअस नोंदविण्यात आले.
