Abhay Chhajed Car Accident | पिरंगुट घाटात अभय छाजेड यांच्या कारचा भीषण अपघात; तिघे जखमी, प्रकृती स्थिर
पुणे : Abhay Chhajed Car Accident काँग्रेसचे माजी शहराध्यक्ष आणि माजी नगरसेवक अभय छाजेड यांच्या कारचा पिरंगुटजवळील कोलाड महामार्गावरील घाटात भीषण अपघात झाला. सोमवारी रात्री साडेनऊच्या सुमारास हा अपघात घडला. या अपघातात छाजेड यांच्यासह तिघे जखमी झाले असून, त्यांच्यावर पुण्यातील खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत.
मिळालेल्या माहितीनुसार, अभय छाजेड हे पिरंगुट येथील आर्किटेक्ट महाविद्यालयात गेले होते. तेथून ते इलेक्ट्रिक कारने पुण्याकडे परतत असताना घाटात चालकाचे वाहनावरील नियंत्रण सुटले. त्यामुळे कार रस्ता ओलांडून थेट वन विभागाच्या हद्दीत सुमारे २० फूट वर जाऊन आदळली.
अपघाताची माहिती मिळताच स्थानिक नागरिकांनी तातडीने मदतकार्य सुरू केले. जखमींना रुग्णवाहिकेतून पुण्यातील खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले.
छाजेड यांच्या पाठीला आणि पायाला मार लागला असून त्यांच्यावर पुढील उपचार सुरू आहेत. तसेच इतर दोघांवरही उपचार सुरू असल्याची माहिती मिळाली आहे. अपघाताची माहिती समजताच काँग्रेसचे पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी रुग्णालयात धाव घेतली.
दरम्यान, अभय छाजेड यांची प्रकृती स्थिर असल्याची माहिती काँग्रेसचे शहराध्यक्ष अरविंद शिंदे यांनी दिली.
