Agriculture Minister Datta Bharne | शेतकऱ्यांसाठी मोठी बातमी: 30 जूनपूर्वी कर्जमाफीची रक्कम खात्यात जमा होणार; कृषीमंत्री दत्ता भरणे यांचे स्पष्टीकरण
मुंबई : Agriculture Minister Datta Bharne | राज्यात गेल्या काही महिन्यांपूर्वी शेतकरी नेत्यांच्या तीव्र आंदोलनानंतर सरकारने शेतकऱ्यांना कर्जमाफी देण्याची मोठी घोषणा केली होती. त्यानुसार ३० जून २०२६ पर्यंत पात्र शेतकऱ्यांच्या खात्यात कर्जमाफीचे पैसे जमा करण्याचे आश्वासन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले होते. मात्र, नुकतीच केंद्रीय निवडणूक आयोगाने महाराष्ट्र विधानपरिषदेच्या १७ जागांसाठी निवडणूक जाहीर केल्यामुळे राज्यात आचारसंहिता लागू झाली. त्यामुळे या आचारसंहितेच्या काळात कर्जमाफीचा निर्णय रखडणार का आणि शेतकऱ्यांना ३० जूनची डेडलाईन चुकणार का, अशी मोठी चर्चा आणि संभ्रम राजकीय वर्तुळात व शेतकऱ्यांमध्ये सुरू झाला होता.
या पार्श्वभूमीवर राज्याचे कृषीमंत्री दत्ता भरणे यांनी मोठी माहिती देत शेतकऱ्यांना मोठा दिलासा दिला आहे. कृषीमंत्र्यांनी स्पष्ट शब्दांत सांगितले आहे की, विधानपरिषद निवडणुकीच्या आचारसंहितेमुळे शेतकरी कर्जमाफीच्या प्रक्रियेत कोणतीही अडचण किंवा अडसर येणार नाही. मुख्यमंत्री फडणवीस याबाबत योग्य आणि ठोस निर्णय घेतील आणि ठरलेल्या वेळेतच म्हणजेच ३० जूनपूर्वी सर्व पात्र शेतकऱ्यांच्या बँक खात्यात ही रक्कम जमा केली जाईल.
या योजनेअंतर्गत सरकार नेमके किती पैसे देणार, याचे गणितही कृषीमंत्र्यांनी स्पष्ट केले आहे. त्यानुसार राज्यातील थकबाकीदार शेतकऱ्यांना २ लाख रुपयांपर्यंतची कर्जमाफी दिली जाणार आहे. सर्वात महत्त्वाचे म्हणजे, ज्या प्रामाणिक शेतकऱ्यांनी आपले पीककर्ज वेळेत आणि नियमितपणे फेडले आहे, त्यांनाही सरकारने मोठा दिलासा दिला आहे. अशा नियमित कर्जफेड करणाऱ्या शेतकऱ्यांना ५० हजार रुपयांचे प्रोत्साहनपर अनुदान थेट त्यांच्या खात्यात दिले जाणार आहे.
या निवडणुकीत सर्वसामान्य मतदारांचा सहभाग नसून केवळ स्थानिक स्वराज्य संस्थांमधून निवडून आलेले लोकप्रतिनिधीच मतदानाचा हक्क बजावणार आहेत. त्यामुळे या आचारसंहितेचा कर्जमाफीवर कोणताही नकारात्मक परिणाम होणार नाही, असे कृषीमंत्र्यांनी स्पष्ट केले आहे. सरकारच्या या भूमिकेमुळे आणि कृषीमंत्र्यांच्या खात्रीशीर वक्तव्यानंतर, ऐन खरीप हंगामाच्या तोंडावर राज्यातील लाखो शेतकऱ्यांना मोठा आर्थिक दिलासा मिळाला असून प्रत्यक्ष अंमलबजावणीकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
