Bhimashankar Temple | भीमाशंकर दर्शनासाठी नवा नियम; VIP, शिफारस, प्रोटोकॉल बंद, ऑनलाइन नोंदणी असेल तरच प्रवेश
पुणे : Bhimashankar Temple | बारा ज्योतिर्लिंगांपैकी एक असलेल्या श्रीक्षेत्र भीमाशंकर मंदिराचे दरवाजे तब्बल पाच महिन्यांनंतर भाविकांसाठी पुन्हा खुले करण्यात आले आहेत. विकासकामांमुळे ९ जानेवारी २०२६ पासून बंद असलेले मंदिर १५ जूनपासून जिल्हाधिकाऱ्यांनी घालून दिलेल्या नियम व अटींसह दर्शनासाठी खुले करण्यात आले.
यंदा दर्शनासाठी नवीन व्यवस्था लागू करण्यात आली असून, केवळ ऑनलाइन नोंदणी केलेल्या भाविकांनाच मंदिरात प्रवेश दिला जात आहे. कोणत्याही प्रकारची VIP व्यवस्था, शिफारस, पत्र किंवा प्रोटोकॉलला अपवाद न ठेवता सर्वांसाठी समान नियम लागू करण्यात आले आहेत.
सभामंडपाचे काम अंतिम टप्प्यात असल्याने प्रशासनाने दररोज फक्त एक हजार नोंदणीकृत भाविकांना सकाळी ७ ते ११ या वेळेत दर्शनाची परवानगी दिली आहे. मंदिर उघडल्यानंतर पहिल्याच दिवशी ‘हर हर महादेव’च्या जयघोषात हजारो भाविकांनी दर्शन घेतले.
ऑनलाइन नोंदणी अनिवार्य असल्याची माहिती नसल्यामुळे अनेक भाविक मंदिर परिसरात दाखल झाले. मात्र, नोंदणी नसलेल्या भाविकांना प्रवेश नाकारण्यात आल्याने काहींनी नाराजी व्यक्त केली. काही भाविकांनी आंदोलनाचाही प्रयत्न केला, मात्र पोलिसांनी समजावून सांगत परिस्थिती नियंत्रणात ठेवली.
दरम्यान, काही राजकीय पदाधिकारी आणि प्रभावशाली व्यक्तींनी आपल्या नातेवाईकांना व कार्यकर्त्यांना दर्शन मिळावे यासाठी प्रयत्न केल्याची चर्चा होती. मात्र, प्रशासनाने कोणालाही विशेष सवलत न देता केवळ अधिकृत नोंदणी केलेल्या भाविकांनाच प्रवेश दिला.
श्रीक्षेत्र भीमाशंकर देवस्थान ट्रस्टचे उपकार्यकारी विश्वस्त मधुकर शास्त्री गवांदे यांनी स्पष्ट केले की, “नियम सर्वांसाठी समान असून, ज्या दिवशी ऑनलाइन नोंदणी असेल, त्याच दिवशी संबंधित भाविकांना दर्शन दिले जाईल. कोणत्याही प्रकारच्या शिफारस किंवा प्रोटोकॉलला स्थान दिले जाणार नाही.”
