Vaibhav Suryavanshi | वैभव सूर्यवंशी-सूर्यांश शेडगे शांतपणे परतत असतानाच वाद; श्रीलंका सामन्यातील व्हायरल व्हिडिओमागचे सत्य आले समोर

Vaibhav Suryavanshi | Altercation breaks out as Vaibhav Suryavanshi and Suryansh Shedge walk back calmly; the truth behind the viral video from the Sri Lanka match revealed.

Vaibhav Suryavanshi | भारत-अ आणि श्रीलंका-अ यांच्यातील दांबुला येथे झालेल्या अटीतटीच्या सामन्यानंतर युवा फलंदाज वैभव सूर्यवंशी आणि श्रीलंकेच्या खेळाडूंमधील वादाचा व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल झाला आहे. सुरुवातीला समोर आलेल्या ३५ सेकंदांच्या व्हिडिओमध्ये वैभव सूर्यवंशी श्रीलंकेच्या खेळाडूला धक्का देताना दिसत असल्याने त्याच्यावर टीका करण्यात आली होती. मात्र, आता समोर आलेल्या ५९ सेकंदांच्या संपूर्ण व्हिडिओमुळे या घटनेचे वेगळेच चित्र समोर आले आहे.

मीडिया रिपोर्ट्सनुसार, सामना संपल्यानंतर भारताचे फलंदाज सूर्यांश शेडगे आणि वैभव सूर्यवंशी शांतपणे पॅव्हेलियनकडे परतत होते. त्याचवेळी विजयाचा आनंद साजरा करत असलेल्या श्रीलंकेच्या काही खेळाडूंनी भारतीय खेळाडूंना उद्देशून शेरेबाजी केल्याचा दावा करण्यात आला आहे.

विशेषतः विशेन हलमबागे याने वैभव सूर्यवंशी आणि सूर्यांश शेडगे यांना डिवचण्याचा प्रयत्न केल्याचे सांगितले जात आहे. काही अहवालांनुसार, वैभवला उद्देशून “मॅच संपली आहे, आता घरी जा, ही काही आयपीएल नाही,” अशा स्वरूपाच्या टिप्पणी करण्यात आल्याचा दावा आहे. या कथित चिथावणीनंतर वैभव सूर्यवंशीचा संयम सुटल्याचे आणि त्यानंतर दोन्ही खेळाडूंमध्ये शाब्दिक वादासह धक्काबुक्की झाल्याचे व्हिडिओत दिसून येते.

परिस्थिती चिघळत असल्याचे पाहून श्रीलंकेचा यष्टीरक्षक निरोशन डिकवेला आणि इतर खेळाडूंनी मध्यस्थी करत दोन्ही खेळाडूंना वेगळे केले.

दरम्यान, या घटनेनंतर आयसीसीच्या आचारसंहितेतील नियमांनुसार कारवाई होण्याची शक्यता व्यक्त केली जात असली, तरी सामना पंचांकडून अद्याप कोणतीही अधिकृत घोषणा करण्यात आलेली नाही.

विशेष म्हणजे, सामन्याच्या सुरुवातीपासूनच दोन्ही संघांमध्ये तणावाचे वातावरण असल्याचे दिसून आले होते. सुपर ओव्हरमध्ये श्रीलंकेने विजय मिळवल्यानंतर हा वाद अधिक वाढल्याचे सांगितले जात आहे.

दरम्यान, सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या अपूर्ण व्हिडिओमुळे वैभव सूर्यवंशीवर टीका झाली होती. मात्र, संपूर्ण व्हिडिओ समोर आल्यानंतर या घटनेत केवळ भारतीय खेळाडूलाच जबाबदार धरणे योग्य नसल्याची चर्चा क्रिकेट वर्तुळात सुरू झाली आहे.

You may have missed