CNG Price Hike Pune | पेट्रोल-डिझेलनंतर सीएनजीचाही मोठा झटका; पुणे आणि नाशिकमध्ये नवी दरवाढ लागू

CNG

पुणे : CNG Price Hike Pune | गेल्या काही दिवसांपासून पेट्रोल आणि डिझेलच्या सातत्याने वाढणाऱ्या किमतींमुळे सर्वसामान्य नागरिक आधीच होरपळत असताना, आता सीएनजी वाहनधारकांनाही महागाईचा मोठा फटका बसला आहे. पुण्यात गुरुवारी सकाळपासून सीएनजीच्या दरात प्रति किलोमागे २.५० रुपयांची मोठी वाढ करण्यात आली.

या नव्या दरवाढीमुळे पुण्यात आता सीएनजीचा दर प्रति किलो ९४.८५ रुपये इतका झाला आहे. ही दरवाढ पुणे शहरासह पिंपरी-चिंचवड, चाकण, तळेगाव आणि हिंजवडी परिसरातील सर्व पेट्रोल पंपांवर लागू करण्यात आली आहे. पुण्याव्यतिरिक्त नाशिकमध्येही सीएनजीच्या दरात प्रति किलो १ रुपयाची वाढ झाली आहे. त्यामुळे वाढत्या इंधनदरांचा आर्थिक भार आता सीएनजी वापरणाऱ्या रिक्षाचालक, कॅबचालक आणि खासगी वाहनधारकांनाही सहन करावा लागणार आहे.

या दरवाढीमागे सीएनजी क्षेत्रासाठी लागणाऱ्या नैसर्गिक वायूच्या इनपुट कॉस्टमध्ये झालेली वाढ कारणीभूत असल्याचे सांगितले जात आहे. विशेष म्हणजे चालू मे महिन्यात सीएनजीच्या दरात झालेली ही दुसरी वाढ आहे; यापूर्वी ९ मे रोजी सीएनजीच्या किमतीत १.५० रुपयांची वाढ करण्यात आली होती. काही दिवसांपूर्वी देशाची राजधानी दिल्लीत सीएनजीचे दर वाढल्यानंतर महाराष्ट्रातही दरवाढ होणार अशी शक्यता वर्तवली जात होती, जी आता खरी ठरली आहे. कमी खर्चिक आणि पर्यावरणपूरक पर्याय म्हणून गेल्या काही वर्षांत अनेक नागरिकांनी सीएनजी वाहनांकडे आपला मोर्चा वळवला होता, मात्र आता सीएनजीही महागाईच्या कचाट्यात सापडला आहे.

You may have missed