Chandrashekhar Bawankule On Harshwardhan Sapkal | ‘सपकाळांना महाराष्ट्रात फिरू देणार नाही’; चंद्रशेखर बावनकुळेंचा काँग्रेस नेत्याला थेट इशारा
नागपूर : Chandrashekhar Bawankule On Harshwardhan Sapkal | काँग्रेसचे नेते हर्षवर्धन सपकाळ यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर केलेल्या वादग्रस्त वक्तव्यामुळे महाराष्ट्रातील राजकीय वातावरण तापले आहे. या विधानाचा खरपूस समाचार घेत राज्याचे महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी काँग्रेसवर जोरदार हल्लाबोल केला आहे.
नागपूर येथे प्रसारमाध्यमांशी बोलताना बावनकुळे यांनी अत्यंत आक्रमक पवित्रा घेत, “हर्षवर्धन सपकाळ यांना महाराष्ट्रात फिरू देणार नाहीत,” असा थेट इशारा दिला. पंतप्रधान आणि मुख्यमंत्र्यांसारख्या सर्वोच्च पदांवरील नेत्यांविरोधात करण्यात आलेली टीका ही अत्यंत अश्लील, नीच आणि नालायकपणाची आहे, अशा तीव्र शब्दांत त्यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या. तसेच, हर्षवर्धन सपकाळ यांनी आपली स्वतःची राजकीय उंची आणि आपण कोणाविरोधात बोलत आहोत याचे भान ठेवून वक्तव्ये करावीत, असा सल्लाही त्यांनी दिला.
या पत्रकार परिषदेत बावनकुळे यांनी केवळ काँग्रेसवर टीका केली नाही, तर आगामी विधान परिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर महायुतीच्या जागावाटपाबाबतही महत्त्वाची माहिती दिली. महायुतीमधील जागावाटपाबाबत ९९ टक्के चर्चा पूर्ण झाली असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. शिवसेना, भाजप आणि राष्ट्रवादी काँग्रेस या तिन्ही पक्षांच्या प्रमुख नेत्यांमध्ये अंतिम फेरीची चर्चा झाली असून, येत्या एक-दोन दिवसांत जागावाटपाची अधिकृत घोषणा केली जाईल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. या जाहीर इशाऱ्यामुळे आता भाजप विरुद्ध काँग्रेस असा नवा संघर्ष विदर्भासह संपूर्ण राज्यात पेटण्याची शक्यता निर्माण झाली आहे.
