Daund Pune Crime News | पुणे : सरकारी तक्रारी मागे घेण्यासाठी बिल्डरकडे 6 लाखांच्या खंडणीची मागणी; दोघांना अटक

Pune Crime News

पुणे / दौंड : Daund Pune Crime News |  विविध सरकारी कार्यालयांमध्ये दाखल करण्यात आलेल्या तक्रारी मागे घेण्यासाठी कुरकुंभ येथील बांधकाम व्यावसायिकाकडे तब्बल सहा लाख रुपयांच्या खंडणीची मागणी केल्याप्रकरणी दौंड पोलिसांनी दोघांना अटक केली आहे. या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास सुरू आहे.

अटक करण्यात आलेल्यांमध्ये संदीप पोपट भागवत Sandeep Popat Bhagwat (रा. कुरकुंभ) आणि दीपक मधुकर मुंडलीक Deepak Madhukar Mundalik (रा. कुरकुंभ) यांचा समावेश आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी चांगदेव सावता बनकर (वय ४७, रा. कुरकुंभ, ता. दौंड, जि. पुणे) हे बांधकाम व्यावसायिक आहेत. आरोपी दीपक मुंडलीक याने बनकर यांच्याविरोधात शस्त्र परवाना रद्द करणे, इमारतीच्या चौथ्या मजल्यावर कारवाई करणे तसेच विविध सरकारी कार्यालयांत अनेक तक्रारी आणि अर्ज दाखल केले होते. त्यामुळे बनकर यांना सातत्याने त्रास सहन करावा लागत होता.

दरम्यान, या तक्रारी मागे घेण्यासाठी संदीप भागवत याने मध्यस्थी करत सुरुवातीला १५ लाख रुपयांची मागणी केली. चर्चेनंतर ही रक्कम सहा लाख रुपयांपर्यंत कमी करण्यात आल्याचे तक्रारीत नमूद करण्यात आले आहे.

याप्रकरणी चांगदेव बनकर यांनी दौंड पोलिस ठाण्यात फिर्याद दाखल केली. हवालदार नितीन चव्हाण यांनी गुन्ह्याची नोंद केली असून, पोलिस उपनिरीक्षक रूपेश कदम या प्रकरणाचा पुढील तपास करीत आहेत.

You may have missed