Gangapuram Society Viman Nagar Pune | गंगापुरम सोसायटीवर नेमलेल्या प्रशासकानेच केला 1 कोटीहून अधिक रक्कमेचा अपहार, सहकार निबंधकांनी नेमली चौकशी समिती
पुणे : Gangapuram Society Viman Nagar Pune | विमाननगर येथील गंगापुरम सहकारी गृहरचना संस्थेवर सहकार निबंधकांनी नेमलेल्या प्रशासकाने काही जणांना हाताशी धरुन तब्बल १ कोटी रुपयांचा अपहार केल्याचा सदस्यांनी आरोप केला आहे. याप्रकरणी उपनिबंधकांनी अॅड. महेश काळभोर यांची चौकशी समिती नेमली आहे. सोसायटीचा कारभार सुधारुन निवडणुका घेऊन नवीन समितीच्या हाती कारभार सोपविण्यासाठी सोसायटीवर प्रशासक नेमला जातो. परंतु, आता प्रशासकच मोठमोठ्या रक्कमांचा अपहार करीत असल्याचे पुण्यातील हे आणखी एक उदाहरण समोर आले आहे. यापूर्वी कोथरुड, खराडी, कात्रज परिसरातील सोसायट्यांमध्ये असेच प्रकार घडले होते.
विमाननगर येथील गंगापूरम सोसायटी यामध्ये २७० सदस्य असून परिसरातील ही मोठी सहकारी गृहरचना संस्था आहे. सोसायटीचे चेअरमन अनुप केसरवाल हे असून त्यांनी कारभार हाती घेतल्यानंतर प्रशासकांनी केलेल्या अफरातफरीचा प्रकार समोर आला आहे.
याबाबत सोसायटीचे सदस्य दशरथ गद्रे यांनी सांगितले की, सोसायटीमधील काही जणांनी तक्रार केल्याने उपनिबंधकांनी २०१९ ते २०२२ दरम्यान जयसिंग बिडकर यांची प्रशासक म्हणून नेमणूक केली आहे. प्रशासकाला कोणतेही मुख्य निर्णय घेण्याचे अधिकार नसतात. तरीही त्यांनी वार्षिक सर्वसाधारण सभा न घेता ४ – ५ सभासदांना बोलावून वार्षिक सर्वसाधारण सभा झाल्याच्या नोंदी करुन त्यात ठराव करुन घेतले. आमदार सुनिल टिंगरे यांनी आमदार निधीतून अंतर्गत रस्त्यांचे डांबरीकरणाचे काम केले होते. या नवीन रस्त्याच्या कडेने डांबर खडी पावसामुळे वाहुन जाऊ नये, म्हणून पेव्हिंग ब्लॉक कडेने लावणे आवश्यक आहे, असे माजी अध्यक्ष गणपत यांनी सुचित केले होते. याशिवाय सभेने कोणत्याही कामास व खर्चास मंजुरी दिलेली नसताना प्रशासक बिडकर याने चुकीच्य पद्धतीने ६८ लाख रुपयांची कामे करुन घेतली.
मुदत ठेवीं मुदतीपूर्वीच मोडल्या
सर्वसाधारण सभेने मुदत ठेव रक्कम मोडून खर्च करण्याचे कोणतेही अधिकार प्रशासकाला दिले नव्हते. तरीही ३४ लाख रुपयांची मुदत ठेव मोडण्यात आली. त्यामुळे संस्थेचे नुकसान झाले आहे. तसेच ४४ लाख रुपयांच्या मुदत ठेवी मुदतपूर्व काढून घेऊन खर्च केली. त्यामुळे संस्थेला १ टक्के रक्कमेचा तोटा सहन करावा लागला.
सोसायटीमध्ये जी कामे करुन हर्षद या ठेकेदाराकडून करवुन घेण्यात आली. प्रत्यक्षात सोसायटीमध्ये घरकाम करणार्या राहुल गवळी याच्या वैयक्तिक नावाने ही बिले बेअरर चेकने अदा करण्यात आली आहेत.
याबाबत दशरथ गद्रे यांनी सांगितले की, त्यांचा फ्लॅट ५७० चौरस फुट आहे. त्यांच्या टेरेसवर कोणतेही काम झालेले नाही. मात्र या फ्लॅटचा टेरेस १४४० चौरस फुटाचा दाखविला आहे. त्यावर कामे करुन घेतल्याचे दाखविले आहे. हषेद कॉन्ट्रॅक्टर याला कोणतेही प्रकारची स्थानिक संस्थेची मान्यता नव्हती.
राहुल गवळी हा सोसायटीत घरकाम करणार्याच्या नावाने जवळपास १५० धनादेश काढण्यात आले आहेत. त्याच्या नावाने ७० लाख रुपये बेअरर चेकद्वारे काढण्यात आले असून ते पूर्णपणे बेकायदेशीर आहे.
पूर्नविकासासाठी ५०० कोटींची योजना
ज्यांच्या तक्रारी वरुन सोसायटीमध्ये प्रशासक नेमण्यात आला. त्याचे लोक आता सोसायटीचा पुर्नविकासाचा ५०० कोटी रुपयांचा प्रस्ताव आणू पहात आहेत. बिल्डरशी संधान साधून स्वत:चे भले करण्याचा या लोकांचा डाव असल्याचे दशरथ गद्रे यांनी सांगितले.
प्रशासकच आता मलिदा खाऊ लागल्याने सहकार निबंधकांनी आपल्या नियमावलीत बदल करुन ती अधिक कडक करण्याची आवश्यकता असल्याचे गद्रे यांनी सांगितले.
