Pune Crime News | पुणे : ‘50 हजार रुपये दे, नाहीतर पोलिसांच्या ताब्यात देतो’; गांजा तस्करीच्या नावाखाली लूटमार करणाऱ्या दोघांना अटक
पुणे : Pune Crime News | गांजा तस्करीचा खोटा आरोप करून एका तरुणाला चाकूचा धाक दाखवत रोख रक्कम, सोन्याची बाळी आणि ऑनलाइन पैसे उकळणाऱ्या दोघांना पर्वती पोलिसांनी अटक केली आहे. प्रमोद अंकुश कळंबे Pramod Ankush Kalambe (वय २०, रा. पर्वती दर्शन) आणि बसवराज ऊर्फ अभिषेक राजेंद्र पाटील Basavaraj alias Abhishek Rajendra Patil (वय २०, रा. जनता वसाहत, सध्या कात्रज खोपडे नगर) अशी अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे आहेत.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, ६ जून रोजी पर्वती पायथा परिसरात काही जणांनी एका तरुणाला अडवून चाकूचा धाक दाखवला. “तू गांजा विकण्यासाठी येथे आला आहेस. पोलिसांना माहिती देतो, तुला वाचायचे असेल तर ५० हजार रुपये दे,” अशी धमकी देत आरोपींनी त्याच्याकडून ३ हजार रुपये रोख, सोन्याची बाळी तसेच गुगल पेद्वारे २१ हजार रुपये ऑनलाइन उकळले.
या प्रकरणी गुन्हा दाखल होताच पर्वती पोलिसांनी तपासाची चक्रे वेगाने फिरवली. तपास अधिकारी किरण पवार यांना तपासादरम्यान आरोपींबाबत माहिती मिळाल्यानंतर पोलिसांच्या पथकाने प्रमोद कळंबे आणि बसवराज पाटील यांना ताब्यात घेतले. चौकशीनंतर दोघांकडून गुन्ह्यातील मुद्देमालही जप्त करण्यात आला.
ही कारवाई पोलिस उपायुक्त मिलिंद मोहिते, सहायक पोलिस आयुक्त धन्यकुमार गोडसे, वरिष्ठ पोलिस निरीक्षक राजेंद्र सहाणे यांच्या मार्गदर्शनाखाली उपनिरीक्षक किरण पवार, प्रकाश मरगजे, महेश मंडलिक, राकेश सुर्वे, स्वप्निल घुगे, नानासो खाडे, मनोज बनसोड, सद्दाम शेख आणि सूर्या जाधव यांच्या पथकाने केली.
