Gold Silver Price Today | सोन्यामध्ये सलग दुसऱ्या दिवशी घसरण, तर चांदीच्या दरात मोठी उसळी; जाणून घ्या महाराष्ट्रासह प्रमुख शहरांतील आजचे ताजे भाव

Gold

नवी दिल्ली/मुंबई :  Gold Silver Price Today | जागतिक बाजारातील मोठ्या घडामोडी आणि सरकारी निर्णयांचा थेट परिणाम सध्या सराफा बाजारावर पाहायला मिळत आहे. आज मंगळवारी देशांतर्गत बाजारात सोन्याच्या दरात सलग दुसऱ्या दिवशी घसरण नोंदवली गेली असून, सोने खरेदी करू इच्छिणाऱ्या ग्राहकांना काहीसा दिलासा मिळाला आहे. मात्र, दुसरीकडे चांदी खरेदी करणाऱ्यांच्या तोंडचे पाणी पळाले आहे. चांदीच्या दराने पुन्हा एकदा मोठी झेप घेतली असून, दोन दिवसांत चांदी तब्बल १०,१०० रुपयांनी महागली आहे. गेल्या दोन दिवसांत २४ कॅरेट सोन्याच्या दरात प्रति १० ग्रॅममागे ७१० रुपयांची, तर २२ कॅरेट सोन्यामध्ये ६६० रुपयांची घट झाली आहे.

आंतरराष्ट्रीय स्तरावर कच्च्या तेलाच्या वाढत्या किमती, अमेरिकन बाँड यील्डमधील तेजी आणि अमेरिका-इराण कराराबाबत निर्माण झालेली अनिश्चितता यामुळे मौल्यवान धातूंच्या किमतीत मोठी चढ-उतार सुरू आहे. याशिवाय, केंद्र सरकारने सोन्या-चांदीच्या आयातीवरील शुल्क ६ टक्क्यांवरून थेट १५ टक्के केल्याचा आणि चांदीच्या काही श्रेणींना ‘प्रतिबंधित’ यादीत टाकल्याचा मोठा परिणाम बाजारपेठेवर झाला आहे. सरकारी मंजुरीशिवाय चांदीची आयात करण्यावर मर्यादा आल्यामुळे देशांतर्गत बाजारात चांदीची टंचाई निर्माण झाली आहे, ज्याचा परिणाम म्हणून किमती कमालीच्या वाढल्या आहेत.

आज दिल्ली, मुंबई आणि कोलकाता येथे एक किलो चांदीचा भाव तब्बल २,९०,१०० रुपयांवर पोहोचला आहे, तर चेन्नईमध्ये चांदी सर्वाधिक महाग म्हणजेच ३,००,१०० रुपये प्रति किलो दराने विकली जात आहे. मुंबई आणि महाराष्ट्रातील इतर महत्त्वाच्या शहरांमध्ये २४ कॅरेट सोन्याचा दर प्रति १० ग्रॅम १,५६,२१० रुपये, तर २२ कॅरेट सोन्याचा दर १,४३,१९० रुपये इतका नोंदवला गेला आहे. १८ कॅरेट सोन्याचा दर प्रति तोळा १,१७,१६० रुपयांच्या आसपास आहे. नाशिक आणि पुणे सराफा बाजारातही सोन्या-चांदीचे दर मुंबईच्या दराशी मिळतेजुते राहतील.

देशातील सर्वात महाग सोने सध्या चेन्नईमध्ये असून, तिथे २४ कॅरेट सोन्यासाठी प्रति तोळा १,६०,०९० रुपये मोजावे लागत आहेत. जागतिक पातळीवरील आर्थिक अस्थिरतेमुळे ग्राहक सध्या ‘थांबा आणि पाहा’ या भूमिकेत असल्याचे सराफा व्यापाऱ्यांचे म्हणणे आहे. लग्नकार्याचा आणि अधिकमासाचा काळ सुरू असताना सोन्यातील ही घसरण ग्राहकांसाठी दिलासादायक ठरली असली, तरी चांदीने गाठलेल्या नव्या उच्चांकामुळे भांडी आणि दागिने खरेदी करणाऱ्यांचे बजेट मात्र पूर्णपणे कोलमडले आहे.

You may have missed