MS Dhoni | ‘तू ना जा मेरे बादशाह…’; चेन्नईतील शेवटच्या सामन्यानंतर एम. एस. धोनीने आकाशाकडे पाहत दिले निवृत्तीचे संकेत? चाहत्यांचे डोळे पाणावले
मुंबई : MS Dhoni | आयपीएल २०२६ चा हंगाम आता अंतिम टप्प्याकडे सरकत असताना, चेन्नई सुपर किंग्सचा थाला म्हणजेच महेंद्रसिंग धोनी याच्या एका भावनिक व्हिडिओने जगभरातील क्रिकेट चाहत्यांचे लक्ष वेधून घेतले आहे.
चेन्नईच्या एम. ए. चिदंबरम (चेपॉक) स्टेडियमवर चेन्नई सुपर किंग्स आणि सनरायझर्स हैदराबाद यांच्यात झालेल्या लढतीदरम्यान ही हृदयस्पर्शी घटना घडली. या सामन्यात हैदराबादने चेन्नईचा ५ विकेट्सने पराभव करत प्लेऑफमधील आपले स्थान जवळपास निश्चित केले, तर चेन्नईचा पुढील प्रवास आता इतर संघांच्या कामगिरीवर अवलंबून राहिला आहे. मात्र, या पराभवापेक्षाही मैदानावरील धोनीच्या एका कृतीने चेन्नईच्या चाहत्यांना कमालीचे भावूक केले असून, त्याने आयपीएलमधून निवृत्ती घेण्याचे संकेत दिल्याचा अंदाज लावला जात आहे.
या संपूर्ण हंगामात एम. एस. धोनी पायाच्या दुखापतीमुळे एकही सामना खेळू शकलेला नाही. हैदराबादविरुद्धच्या या अत्यंत महत्त्वाच्या सामन्यातही तो मैदानात उतरेल अशी आशा चाहत्यांना होती, मात्र दुखापतीमुळे तो खेळू न शकल्याने चेपॉक स्टेडियमवर आलेल्या हजारो चाहत्यांची निराशा झाली. परंतु, चेन्नईचा या घरच्या मैदानावरील हंगामातील हा शेवटचा सामना असल्याने, पहिल्या डावाच्या विश्रांतीदरम्यान चेन्नई संघाच्या वार्षिक ‘टिम फोटो’साठी धोनी मैदानात आला. धोनी ७ नंबरची पिवळी जर्सी घालून मैदानावर येताच संपूर्ण स्टेडियममध्ये त्याच्या नावाचा इतका प्रचंड जयघोष झाला की, तेथे उपस्थित समालोचकांनाही एकमेकांचा आवाज ऐकणे कठीण झाले होते.
खरा भावनिक क्षण टिम फोटो काढल्यानंतर पाहायला मिळाला. फोटो सेशन संपवून जेव्हा धोनी ड्रेसिंग रूमच्या दिशेने परतत होता, तेव्हा मैदानाची सीमारेषा ओलांडताना तो अचानक थांबला. त्याने आपली मान वर करून काही सेकंद आकाशाच्या दिशेने पाहिले. सोशल मीडियावर समोर आलेल्या व्हिडिओनुसार, यावेळी त्याचे डोळे काहीसे पाणावलेले दिसत होते आणि चेपॉकच्या मैदानावर खेळाडू म्हणून ही आपली शेवटचीच झलक असल्याचे जणू तो मनाशी स्वीकारत होता. धोनीच्या याच कृतीमुळे सोशल मीडियावर तो आता पुढील हंगामात आयपीएलमध्ये खेळताना दिसणार नाही, अशा चर्चांना उधाण आले आहे.
धोनीचा हा व्हिडिओ वाऱ्यासारखा व्हायरल झाला असून चाहते “तू ना जा मेरे बादशाह…” हे गाणे बॅकग्राउंडला लावून सोशल मीडियावर अत्यंत भावनिक पोस्ट शेअर करत आहेत. चेन्नई सुपर किंग्सने या हंगामात अनेक दुखापतींचा सामना केला आहे, त्यातच धोनीची मैदानावरील अनुपस्थिती चाहत्यांना सातत्याने सलत होती. चेपॉक स्टेडियमवरील या शेवटच्या सामन्यानंतर धोनीने चाहत्यांचा निरोप घेतल्याचे चित्र निर्माण झाल्यामुळे, अधिकृत घोषणा झाली नसली तरी क्रिकेट जगतातील एका सुवर्णकाळाचा शेवट जवळ आल्याची भावना क्रीडाप्रेमी व्यक्त करत आहेत.
