Jejuri News | येळकोट येळकोट जय मल्हार..! सोमवती अमावास्येनिमित्त जेजुरीत भाविकांचा महासागर; तीन लाखांहून अधिक भक्तांनी घेतले खंडोबाचे दर्शन

Jejuri News | Yelkot Yelkot Jai Malhar! A sea of ​​devotees in Jejuri for Somvati Amavasya; over three lakh devotees sought blessings from Lord Khandoba.

जेजुरी : Jejuri News |  अवघ्या महाराष्ट्राचे कुलदैवत असलेल्या श्री खंडोबाच्या जेजुरी नगरीत सोमवती अमावास्येनिमित्त भाविकांचा महासागर उसळला. दीड वर्षांनंतर आलेल्या सोमवती यात्रेनिमित्त सुमारे तीन लाखांहून अधिक भाविकांनी कुलदैवत मल्हारी मार्तंडाचे दर्शन घेतले. अधिक महिन्यातील अमावास्या आणि सोमवती योग जुळून आल्याने रविवारीपासूनच भाविकांनी जेजुरीत मोठ्या प्रमाणावर मुक्काम केला होता.

अमावास्येचा पर्वकाळ लक्षात घेऊन रविवारी मध्यरात्रीनंतर दोन वाजता पारंपरिक पालखी सोहळा कऱ्हा स्नानासाठी रवाना झाला. मानकरी पेशव्यांच्या इशारतीनंतर “सदानंदाचा येळकोट… येळकोट येळकोट जय मल्हार”च्या गजरात पालखी उचलण्यात आली. यावेळी भाविकांनी भंडारा आणि खोबऱ्याची मुक्तहस्ते उधळण करत भक्तिभाव व्यक्त केला.

मुख्य मंदिराला प्रदक्षिणा घालून पालखी बालदारी येथे पोहोचली. तेथे देवाचे पुजारी उपाध्ये यांनी मल्हारी म्हाळसाकांताच्या उत्सवमूर्ती विधिवत आणून पालखीत विराजमान केल्या. त्यानंतर पालखी सोहळा मुख्य प्रवेशद्वारातून बाहेर पडत नंदी चौक, चिंचबागेतील गौतमेश्वर मंदिर, जानाई मंदिर चौक आणि शिवाजी महाराज चौक मार्गे कऱ्हा नदीकडे रवाना झाला.

सोमवारी सकाळी सातच्या सुमारास रंभाई शिंपीन स्नान घाटावर उत्सवमूर्तींना विधिवत कऱ्हा स्नान घालण्यात आले. त्यानंतर पालखी सोहळा पुन्हा मंदिराकडे परतला.

दीड वर्षांनंतर भरलेल्या सोमवती यात्रेमुळे आणि अधिक महिन्यातील अमावास्येमुळे जेजुरी नगरीत संपूर्ण रात्रभर धार्मिक विधी, कुळधर्म आणि कुलाचार सुरू होते. भंडाऱ्याच्या उधळणीमुळे संपूर्ण शहर पिवळ्या रंगात न्हाऊन निघाले होते आणि ‘सोन्याची जेजुरी’ हा अनुभव भाविकांना प्रत्यक्षात पाहायला मिळत होता.

उत्सव काळात मार्तंड देव संस्थानच्या विश्वस्तांनी तसेच प्रशासनाने भाविकांना सुलभ दर्शन मिळावे यासाठी विशेष नियोजन केले. जेजुरी पोलिसांनीही चोख बंदोबस्त ठेवत संपूर्ण यात्रा शांततेत आणि सुरळीत पार पाडली.

You may have missed