Pune Cyber Crime News | गुंतवणुकीवर चांगला परतावा देण्याचे आमिष दाखवून सायबर चोरटे व्यावसायिकांची करत होते तब्बल 7 वर्षे फसवणूक, व्यावसायिकाच्या मृत्युनंतर फसवणूकीचा प्रकार उघडकीस
पुणे : Pune Cyber Crime News | व्यावसायिकाला चांगल्या परताव्याचे आमिष दाखवून सायबर चोरटे तब्बल ७ वर्षे फसवणूक करत होते. ७ वर्षात त्यांनी तब्बल ५ कोटी २१ लाख ३७ हजार १७१ रुपये भरले होते. ते हॉस्पिटलमध्ये असतानाही सायबर चोरट्यांचे फोन येत होते. त्यावरुन चौकशी केल्यावर अशी कोणतीही कंपनी नसल्याचे उघडकीस आले.
याबाबत मंगलवाडी येथील एका ७५ वर्षाच्या महिलेने चतु:श्रृंगी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यावरुन पोलिसांनी एन जी पी आय कंपनीतर्फे अवतारसिंग, रेड्डी, देसाई, वेणुगोपाल, संजीव शर्मा, एफ आर सर्व्हिसेस तर्फे रेना शर्मा, अजय कुमार, चंद्र प्रकाश, सुशिल( रा. अंबरनाथ ठाणे) व इतरांवर गुन्हा दाखल केला आहे. हा प्रकार २०१८ पासून ऑक्टोंबर २०२५ पर्यंत सुरु होता.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी यांच्या पतीचा लंगार विडीचा व्यवसाय आहे. त्यांच्या पतीचे गेल्या वर्षी ऑक्टोंबर २०२५ मध्ये कर्करोगाने निधन झाले. ते २०१८ पासून एनजीपीआय या कंपनीमध्ये पैसे गुंतवत असल्याचे त्यांनी १ ऑक्टोंबर २०२५ रोजी हॉस्पिटलमध्ये अॅडमीट असताना सांगितले. ते हॉस्पिटलमध्ये असताना ते नेहमी फिर्यादीकडून फोन वारंवार घेत असे. फोनवर बोलत असे. तसेच ते हॉस्पिटलमध्ये असताना त्यांच्याकडे या कंपनीमध्ये गुंतवण्यासाठी ५० हजार रुपये मागितले होते. त्यांचा व्यवसाय असल्याने त्यांनी कधी त्यांना काय करत आहात, याबाबत विचारले नाही. १४ जुलै २०२५ रोजी त्यांच्या पतीच्या मोबाईलमध्ये १७ कोटी ८४ लाख १२ हजार रुपये देणे आहे, असा मेसेज देसाई या महिलेने केलेला दिसून आला. हॉस्पिटलमध्ये असताना त्यांनी काही थोड्या दिवसातच मला माझी रक्कम नफ्यासह मिळणार आहे, असे सांगितले होते.
परंतु, वयोमानाने ते आजारी असताना उपचार सुरु असताना त्यांचे निधन झाले. त्यानंतरही त्यांच्या मोबाईलवर कंपनीच्या गुंतवणुकीकरीता फोन येत होते. ते फिर्यादींना पतीकडे फोन देण्यासाठी सांगत होते. परंतु, आम्ही ते आता बोलू शकत नाही, असे सांगत होतो. कारण त्यांना पतीने कोणत्या कंपनीमध्ये पैसे गुंतवले आहेत, याची माहिती घ्यायची होती. त्यांच्या मुलीने ऑनलाइन एनजीपीआय कंपनीविषयी माहिती घेतली असता कोणत्याही प्रकारची माहिती उपलब्ध झाली नाही. त्यावरुन त्यांच्या लक्षात आले की, ही कंपनी अस्तित्वात नाही. त्यांनी तपासणी केल्यावर त्यांच्या पतीने २०१८ ते २०२५ दरम्यान १६७ वेळा पैसे पाठवले होते. त्यावरुन त्यांची ५ कोटी २१ लाख ३७ हजार १७१ रुपयांची फसवणूक झाल्याचे लक्षात आले. आर्थिक गुन्हे शाखेच्या सहायक पोलीस निरीक्षक उत्कर्षा देशमुख तपास करीत आहेत.
