Pune Crime News | महाकालच्या दर्शनासाठी गेलेल्या पुण्यातील 19 वर्षीय तरुणाचा नदीत बुडून मृत्यू; कुटुंबाचा आधार होण्याआधीच नियतीने हिरावले आयुष्य
पुणे : Pune Crime News | महाकालेश्वराच्या दर्शनासाठी उज्जैनला गेलेल्या पुण्यातील १९ वर्षीय तरुणाचा नदीत पाय घसरून बुडाल्याने दुर्दैवी मृत्यू झाल्याची हृदयद्रावक घटना समोर आली आहे. आदित्य चौगुले (वय १९, रा. साठेनगर, मोझे शाळेजवळ, लोहगाव) असे मृत्यू झालेल्या तरुणाचे नाव असून, तो आई-वडिलांचा एकुलता एक मुलगा होता. या घटनेमुळे लोहगाव परिसरात शोककळा पसरली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, आदित्य हा भगवान महाकालाचा निस्सीम भक्त होता. दर्शनाच्या ओढीने तो एकटाच उज्जैनला गेला होता. १० जून रोजी तेथील नदीत स्नान करत असताना अचानक त्याचा पाय घसरला आणि तो पाण्याच्या खोल पात्रात वाहून गेला.
दर्शनासाठी घरातून निघाल्यानंतर आदित्य सातत्याने आपल्या आई-वडिलांच्या संपर्कात होता. मात्र, अचानक दोन दिवस त्याच्याशी संपर्क तुटल्याने कुटुंबीयांची चिंता वाढली. काहीतरी अनर्थ घडल्याची भीती वाटू लागल्याने आई-वडिलांनी तातडीने उज्जैन गाठले.
उज्जैनमध्ये पोहोचल्यानंतर त्यांनी स्थानिक पोलिसांकडे मुलगा हरवल्याची तक्रार नोंदविण्यासाठी धाव घेतली. त्यावेळी पोलिसांनी तीन दिवसांपूर्वी नदीपात्रातून एक मृतदेह सापडल्याची माहिती दिली. ओळख पटवण्यासाठी दाखविण्यात आलेला फोटो पाहताच आदित्यच्या आई-वडिलांच्या पायाखालची जमीन सरकली. तो मृतदेह त्यांच्या एकुलत्या एक मुलाचा असल्याचे स्पष्ट झाल्यानंतर त्यांनी हंबरडा फोडला.
आदित्य हा पदवीच्या अंतिम वर्षात शिक्षण घेत होता. शिक्षण पूर्ण करून तो कुटुंबाचा आधार बनेल, अशी मोठी अपेक्षा आई-वडिलांनी ठेवली होती. मात्र, नियतीने त्यांच्यावर दुःखाचा डोंगर कोसळवला. १४ जून रोजी उज्जैनमध्येच अत्यंत जड अंतःकरणाने आदित्यवर अंत्यसंस्कार करण्यात आले.
एकुलत्या एक मुलाच्या अकाली निधनामुळे चौगुले कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला असून, या घटनेमुळे संपूर्ण लोहगाव परिसरातून हळहळ व्यक्त केली जात आहे.
