Pune Pimpri Crime News | पोलिसांवर दोनदा फायरिंग करुन पळून गेलेल्या सराईत गुन्हेगाराला मालमत्ता गुन्हे विरोधी पथकाने केले जेरबंद; 1 पिस्टल व 1 जिवंत काडतुस केले जप्त
पुणे : Pune Pimpri Crime News | दिघी, रांजणगाव परिसरात पोलिसांवर फायरिंग करुन खुनाचा प्रयत्न करणारा व ७० हून अधिक चोरीचे गुन्हे असणार्या सराईत गुन्हेगाराला मालमत्ता गुन्हे विरोधी पथकाने जेरबंद केले आहे.
शेखर संभाजी जाधव Shekhar Sambhaji Jadhav (वय २५, रा. मु. पो. मोधा, ता. उदगीर, जि. लातूर) असे या सराईत गुन्हेगाराचे नाव आहे.
दिघी परिसरात १३ मे २०२६ रोजी पोलिसांवर फायरिंग करुन शेखर जाधव व त्याचे ३ साथीदार पळून गेले होते. त्यांच्याविरुद्ध दिघी पोलीस ठाण्यात खुनाचा प्रयत्न केल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला होता. या आरोपींचा शोघ घेऊन तांत्रिक तपास केला असता ते रांजणगाव येथे असल्याचे समजले. त्यावरुन १६ मे रोजी गुन्हे शाखेचे पथक रांजणगाव येथे गेले. पोलीस शेखर जाधव व मुस्तफा (भाईजान) यांचा पाठलाग करत असताना पुन्हा पोलिसांवर फायरिंग करुन उसाच्या शेताचा फायदा घेऊन पळून गेले होते. याबाबत रांजणगाव पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता.
मालमत्ता गुन्हे विरोधी पथकाचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक संजय चव्हाण यांनी पथकातील पोलीस अंमलदार गणेश सावंत, विनोद वीर यांना शोध घेण्याबाबत मार्गदर्शन केले. ते तीन वेळा नांदेड, हिंगोली व लातूर जिल्ह्यात जाऊन त्यांचा तपास केला. गोपनीय बातमीदार तयार करुन शेखर जाधवची माहिती काढली.
त्यानंतर मिळालेल्या माहितीवरुन पोलिसांनी दिघी येथील मोझे शाळेजवळ १४ जून रोजी सापळा रचून शेखर जाधव याला पकडले. त्याच्याकडून एक पिस्टल व एक जिवंत काडतुस जप्त केले आहे.
ही कारवाई अपर पोलीस आयुक्त सारंग आवाड, पोलीस उपायुक्त रोहिदास पवार, सहायक पोलीस आयुक्त डॉ. विशाल हिरे यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक संजय चव्हाण, सहायक पोलीस निरीक्षक पांडुरंग देवकाते, गोरक्षनाथ बालवडकर, पोलीस उपनिरीक्षक महेश खांडे, पोलीस अंमलदार नितीन उमरजकर, हर्षद कदम, गणेश कोकणे, गणेश सावंत, विनोद वीर, गणेशा हिंगे, नितीन लोखंडे, सोमनाथ मोरे, चंद्रकांत गडदे, मोहसीन अत्तार, अमर कदम, समीर रासकर, विशाल गायकवाड, ध्यानेश्वर कोळगे, अमर गोरे, औदुंबर रोगे यांनी केली आहे़
