Kondhwa Pune Crime News | (कोंढवा) पुणे : जबरदस्तीने मोबाईल हिसकावुन फरार असलेल्या चोरट्यांना अटक
पुणे : Kondhwa Pune Crime News | व्हिडिओ कॉलवर बोलत असलेल्या तरुणाच्या हातातील मोबाईल जबरदस्तीने हिसकावून दुचाकीवरून पसार झालेल्या दोघांना कोंढवा पोलिसांच्या तपास पथकाने तातडीने शोधून ताब्यात घेतले. पोलिसांनी आरोपींकडून मोबाईल आणि गुन्ह्यात वापरलेली मोपेड जप्त केली आहे.
कोंढवा पोलीस ठाण्याच्या हद्दीत ४ सप्टेंबर २०२६ रोजी ही घटना घडली होती. तक्रारदार दुपारी सुमारे १२ वाजता प्राईम हॉस्पिटलसमोर, कमेला परिसर, कोंढवा येथे मोबाईलवर व्हिडिओ कॉल करत होते.
त्याचवेळी त्यांच्या पाठीमागून अॅक्टिव्हासदृश दुचाकीवरून दोन तरुण आले. दुचाकी चालवणाऱ्या तरुणाने पांढरा शर्ट, तर मागे बसलेल्या तरुणाने लाल रंगाचा शर्ट परिधान केला होता. मागे बसलेल्या तरुणाने तक्रारदाराच्या हातातील मोबाईल जबरदस्तीने हिसकावून घेतला आणि दोघेही कोंढव्याच्या दिशेने भरधाव वेगाने पसार झाले, असे फिर्यादीत नमूद करण्यात आले आहे.
या प्रकरणी कोंढवा पोलीस ठाण्यात भारतीय न्याय संहितेच्या संबंधित कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला.
गुन्हा दाखल होताच तपास पथकातील पोलिसांनी परिसरातील सीसीटीव्ही फुटेज तपासून आरोपींचा शोध सुरू केला. तपासादरम्यान सफी उल्ला हापीज उल्ला शहा (वय १८) आणि मेहताब जलालूदीन चौधरी (वय २०) यांना ताब्यात घेण्यात आले.
पोलिसांच्या माहितीनुसार, दोघांची सखोल चौकशी केल्यानंतर त्यांचा या गुन्ह्यात सहभाग असल्याचे निष्पन्न झाले. त्यांच्याकडून चोरीचा मोबाईल आणि एक मोपेड हस्तगत करण्यात आली.
वरील नमुद कारवाई ही राजलक्ष्मी शिवणकर, रामदास इंगवले, वरिष्ठ पोलीस निरीक्षक़ संतोष खेतमाळस, पोलीस निरीक्षक (गुन्हे) प्रशांत मंडले, पोलीस निरीक्षक (गुन्हे) संतोष चौधरी यांच्या मार्गदर्शनाखाली कोंढवा पोलीस स्टेशन येथील तपास पथकाचे पोलीस उपनिरीक्षक रविंद्र गावडे, पोलीस उप-निरीक्षक सागर पवार, पोलीस हवालदार रविंद्र चिप्पा, मेमाणे, अमोल हिरवे, कारखेले, पोलीस अंमलदार शाहिद रजपुत, प्रशांत खाडे, रशिद शेख, रियाज पटेल, केशव हिरवे, संतोष बनसुडे, सुरज शुक्ला, अमित सुर्यवंशी, राहुल शेलार, पुष्पेंद्र चव्हाण, ओंकार शेटे, रवि जाधव आणि रासगे यांच्या पथकाने केली आहे.
