LPG Cylinder Price Hike | व्यावसायिक एलपीजी सिलिंडरच्या दरात पुन्हा मोठी वाढ; दिल्ली, मुंबईसह प्रमुख शहरांत किमती कडाडल्या
नवी दिल्ली / मुंबई : – LPG Cylinder Price Hike | देशात महागाईचा भडका उडालेला असतानाच आजपासून सर्वसामान्य आणि व्यावसायिक वर्गाला आणखी एक मोठा झटका बसला आहे. तेल विपणन कंपन्यांनी १ जूनपासून १९ किलोग्रॅमच्या व्यावसायिक एलपीजी गॅस सिलिंडरच्या दरांत ४२ रुपयांपासून ते ५३.५० रुपयांपर्यंत मोठी वाढ केली आहे. विशेष म्हणजे मागील महिन्यात, म्हणजेच १ मे रोजी व्यावसायिक सिलिंडरच्या दरातही विक्रमी वाढ करण्यात आली होती, त्यानंतर आता सलग दुसऱ्या महिन्यात ही दरवाढ झाल्याने हॉटेल व्यावसायिक आणि केटरर्स संकटात सापडले आहेत.
या नवीन दरवाढीनुसार, देशाची राजधानी दिल्लीमध्ये १९ किलोच्या व्यावसायिक सिलिंडरच्या दरात ४२ रुपयांची वाढ झाली असून, आता तेथील किंमत ३,११३.५० रुपयांवर पोहोचली आहे. कोलकातामध्ये सर्वाधिक ५३.५० रुपयांची वाढ झाल्याने तेथे एका सिलिंडरसाठी ३,२५५.५० रुपये मोजावे लागणार आहेत. तर मुंबईमध्ये हा दर अंदाजे ४२ रुपयांनी वाढून ३,०२४.५० रुपये झाला आहे. व्यावसायिक वापराव्यतिरिक्त, छोट्या व्यवसायांसाठी वापरल्या जाणाऱ्या ५ किलो वजनाच्या फ्री ट्रेड एलपीजी (FTL) सिलेंडरच्या दरातही ११ रुपयांची वाढ करण्यात आली असून, दिल्लीत त्याचा नवीन दर आता ८२१.५० रुपये झाला आहे.
पश्चिम आशियातील वाढता राजकीय तणाव आणि जागतिक पातळीवरील इंधन पुरवठ्यातील अडचणींमुळे आंतरराष्ट्रीय बाजारात ऊर्जेच्या किमती सातत्याने वाढत आहेत. भारत आपल्या गरजेचा मोठा हिस्सा आयात करत असल्याने या आंतरराष्ट्रीय घडामोडींचा थेट फटका देशांतर्गत बाजाराला बसला आहे. या व्यावसायिक गॅस दरवाढीमुळे आता हॉटेल्स, रेस्टॉरंट्स, ढाबे आणि खाद्यपदार्थांच्या गाड्यांवरील जेवण, चहा आणि नाश्ता महागण्याची दाट शक्यता आहे, ज्याचा अप्रत्यक्ष भार शेवटी सर्वसामान्यांच्या खिशावरच पडणार आहे.
