Pune Crime News | न्यायालयात वाद चालू असताना जेसीबीसह जागा ताब्यात घेण्याचा प्रयत्न; बाणेरमधील घटनेत उद्योजक प्रकाश धारीवाल, मिलिंद कोठाडिया, प्रशांत मांडेकर यांच्यासह 30 ते 35 जणांवर गुन्हा दाखल

Pune Crime News

पुणे : Pune Crime News | बाणेर येथील जागेबाबत न्यायालयात वाद सुरु असताना जेसीबी, टेम्पोसह लोकांना घेऊन येथून पहाटे अतिक्रमण करण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे. यामध्ये उद्योजक प्रकाश धारीवाल, मिलिंद कोठाडिया, प्रशांत मांडेकर यांच्यासह ३० ते ३५ जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

याबाबत ओमकार संजय ताम्हाणे (वय २८, रा. हिरकमल बंगला़ समर्थ कॉलनी, पॅन कार्ड क्लब रोड, बाणेर) यांनी बाणेर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यावरुन पोलिसांनी मिलिंद कोठाडिया (Milind Kothadia), प्रशांत मांडेकर, प्रकाश धारीवाल (Prakash Dhariwal), सुकेशनी बनसोडे, सुप्रिया पांचाळ, सना मोहम्मद शेख (Sana Mohammed Shaikh), कोमल शिंदे, उमा सुनिल पवार (Uma Sunil Pawar), अर्चना ओव्हाळ, दिपा पिंटु विल्यम (Deepa Pintu William) व इतर २५ ते ३० जणांवर गुन्हा दाखल केला आहे. हा प्रकार औंध बाणेर डी पी रोडवरील ताम्हाणे चौकाजवळ ३१ मे रोजी पहाटे साडेतीन वाजता घडला.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी ओमकार ताम्हाणे यांचा व आरोपीं याचा औंध बाणेर डी पी रोडवरील सुमारे १ एकर जागेवरुन वाद सुरु आहे. त्याबाबत न्यायालयात दावा दाखल करण्यात आला आहे. असे असताना न्यायालयाचा आदेश नसताना मिलिंद कोठाडिया, प्रशांत मांडेकर यांच्या सांगण्यावरुन इतरांनी २० ते ३० महिला व पुरुष यांना जमवुन जेसीबी, पत्रे व लोखंडी अँगल, सिमेंट, वाळू, खडी, भरलेले तीन टेम्पो, तसेच पत्रे लावण्याची मशीन, कार घेऊन या जागेवर अतिक्रमण करुन तिचा ताबा घेण्याचा प्रयत्न केला. जागेवर पत्रे मारुन जागा बंदिस्त करत असल्याची माहिती ताम्हाणे यांना मिळाली. तेव्हा ते धावत तेथे गेले. त्यांनी विरोधी केला असता त्यांना लाठी काठी तसेच लाथाबुक्क्यांनी मारहाण करुन जखमी केले. त्यांच्या दीड लाख रुपयांच्या मोबाईलवर काठीचे फटके मारुन तो फोडून मोबाईलचे नुकसान केले. या घटनेची माहिती मिळाल्यावर पोलीस घटनास्थळी पोहचले. त्यांनी सर्वांना तेथून निघून जाण्यास सांगितले.

याबाबत बाणेर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक चंद्रशेखर सावंत यांनी सांगितले की, मिलिंद कोठाडिया यांचे प्रकाश धारीवाल हे भागीदार आहे. फिर्यादी यांच्या सांगण्यावरुन गुन्हा दाखल करण्यात आला आहे. प्रकाश धारीवाल तेथे होते की नव्हते, याची पोलीस खात्री करीत आहेत. पोलीस निरीक्षक विजय खिल्लारे तपास करीत आहेत.

You may have missed