Maharashtra Weather Alert | पुण्यासह मध्य महाराष्ट्र, मराठवाड्यात पुढील 48 तास उष्णतेची लाट; अनेक ठिकाणी यलो अलर्ट जारी

Maharashtra Weather

पुणे : Maharashtra Weather Alert | पुण्यासह मध्य महाराष्टातील काही जिल्हे, मराठवाडा येथे पुढील ४८ तास उष्णतेच्या लाटेचा प्रभाव राहणार आहे. राज्यात पुढील ४ दिवस बहुतांश ठिकाणी कोरडे हवामान राहण्याची शक्यता आहे. १२ व १३ मे रोजी नंदुरबार, जळगाव, धुळे, नाशिक, संभाजीनगर, जालना तसेच पुण्यातील काही भागासाठी यलो अर्लट जारी करण्यात आला आहे. त्यामुळे नागरिकांनी दुपारच्या वेळी घराबाहेर पडताना पुरेशी काळजी घ्यावी, असे आवाहन करण्यात आले आहे.

१४ व १५ मे रोजी नागपूर, अकोला, अमरावती येथे उष्णतेची लाट येण्याची शक्यता आहे.

पुणे शहरातील हडपसर भागात मंगळवारी सकाळी २८.८ सेल्सिअस किमान तापमानाची नोंद झाली आहे. राज्यात विदर्भात कमाल व किमान तापमान सर्वाधिक असते. विदर्भापेक्षा सध्या पुण्यात किमान तापमान सर्वाधिक असल्याचे दिसून येत आहे. पुणे हे उष्णतेचे बेट असल्याचे दिसत आहे. लोहगाव येथे सोमवारी सायंकाळी सर्वाधिक कमाल तापमान ४३.८ अंश सेल्सिअस इतकी नोंद झाली होती. लोहगाव येथील सरासरी कमाल तापमानापेक्षा ती तब्बल ६.३ अंश सेल्सिअसने अधिक होती. अकोला येथे सर्वाधिक कमाल तापमान ४५.१ अंश सेल्सिअस नोंदविले गेले असले तरी सरासरीपेक्षा ते २.९ अंश सेल्सिअसने अधिक होते. त्याचवेळी पुणे शहरात सर्वाधिक ४१.६ अंश सेल्सिअस असताना ते सरासरीच्या तुलनेत ४.१ अंशाने अधिक होते.
मंगळवारी सकाळी  किमान तापमान  मगरपट्टा येथे २८.१, वडगाव शेरी २७.७, कोरेगाव पार्क २७.६, चिंचवड आणि नारायणगाव २६.९, आंबेगाव २६.६, शिवाजीनगर २६.३ अंश सेल्सिअस नोंदविले गेले आहे. पुढील २ दिवस तापमानाचा हा पारा असाच चढता राहण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तविली आहे.

You may have missed