Maharashtra Weather Alert | राज्यातील 24 जिल्ह्यांना वादळी पावसाचा इशारा; हवामान विभागाचा ‘यलो अलर्ट’

rain (1)

पुणे : Maharashtra Weather Alert | महाराष्ट्रात मान्सूनचे आगमन जवळ आलेले असतानाच, हवामान विभागाने राज्यामध्ये मान्सूनपूर्व पावसाचा जोर वाढण्याची शक्यता वर्तवली आहे. ४ जून रोजी राज्यातील तब्बल २४ जिल्ह्यांमध्ये वादळी वाऱ्यासह मुसळधार पावसाचा इशारा (यलो अलर्ट) देण्यात आला आहे.

गेल्या काही दिवसांपासून उत्तर आणि मध्य महाराष्ट्रासह अनेक भागांत उष्णतेचा पारा वाढला होता, मात्र आता वातावरणात अचानक बदल झाला असून दुपारनंतर अनेक ठिकाणी ढगाळ वातावरण आणि विजांच्या कडकडाटासह पाऊस हजेरी लावणार आहे. या मान्सूनपूर्व पावसामुळे नागरिकांना उकाड्यापासून मोठा दिलासा मिळण्याची शक्यता आहे.

हवामान खात्याने दिलेल्या माहितीनुसार, कोकण, मध्य महाराष्ट्र, मराठवाडा आणि विदर्भातील अनेक जिल्ह्यांमध्ये ताशी ३० ते ४० किलोमीटर वेगाने वादळी वारे वाहण्याची शक्यता आहे. यामध्ये प्रामुख्याने पुणे, सातारा, कोल्हापूर, नाशिक, जळगाव, तसेच छत्रपती संभाजीनगर, जालना, परभणी आणि विदर्भातील नागपूर, चंद्रपूर यांसारख्या २४ जिल्ह्यांचा समावेश आहे. काही भागात विजांच्या कडकडाटासह गारपीट होण्याची शक्यताही नाकारता येत नाही. मान्सून अरबी समुद्रात वेगाने पुढे सरकत असून, त्याला पोषक वातावरण तयार झाल्यामुळे राज्यात हा मान्सूनपूर्व पावसाचा इशारा देण्यात आला आहे.

हा पाऊस शेतीकामांसाठी उपयुक्त ठरणार असला, तरी अचानक येणाऱ्या वादळामुळे काढणीला आलेल्या पिकांचे नुकसान होऊ नये म्हणून शेतकऱ्यांनी योग्य ती खबरदारी घ्यावी, असे आवाहन प्रशासनाने केले आहे. तसेच, विजा चमकत असताना नागरिकांनी झाडांचा किंवा पत्र्यांच्या शेडचा आसरा घेऊ नये आणि सुरक्षित ठिकाणी राहावे, अशा सूचना देण्यात आल्या आहेत. पुढील दोन ते तीन दिवस राज्यात हीच स्थिती कायम राहण्याचा अंदाज असून, जूनच्या पहिल्या आठवड्याअखेरीस मान्सून महाराष्ट्रात अधिकृतपणे धडकण्याची शक्यता आहे.

You may have missed