Pune Water Supply | पुणेकरांवर पाणीटंचाईचे संकट; पुढील आठवड्यापासून शहरात दिवसाआड पाणीपुरवठा होण्याची शक्यता
पुणे : Pune Water Supply | उन्हाळ्याचा कडाका आणि मान्सूनच्या आगमनाला होणारा संभाव्य विलंब यामुळे पुणे शहरावर पाणीटंचाईचे मोठे संकट ओढवले आहे. शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या खडकवासला धरण साखळी प्रकल्पातील पाणीसाठा झपाट्याने खालावल्यामुळे, पुढील तीन महिन्यांचे नियोजन करण्यासाठी प्रशासनाने कंबर कसली आहे. परिस्थितीचे गांभीर्य ओळखून पुणे महापालिकेच्या पाणीपुरवठा विभागाने पुढील आठवड्यापासून शहरात ‘दिवसाआड’ पाणीपुरवठा करण्याचा प्रस्ताव महापालिका आयुक्तांना सादर केला आहे. जून महिना सुरू झाला तरी पूर्वमोसमी पावसाने अद्याप हजेरी लावलेली नाही, तसेच मान्सून देखील लांबण्याची शक्यता वर्तवली जात असल्याने प्रशासनाला आतापासूनच पाण्याच्या काटेकोर नियोजनावर भर द्यावा लागत आहे.
सध्या खडकवासला, पानशेत, वरसगाव आणि टेमघर या चारही धरणांमध्ये मिळून अवघा साडेपाच टीएमसीच्या आसपास पाणीसाठा शिल्लक आहे. नियमानुसार या काळात धरणांमध्ये किमान साडेसहा टीएमसी पाणी असणे आवश्यक होते. पुणे शहराला दरमहा साधारण दीड टीएमसी पाणी लागते. जर सध्याच्या पद्धतीनेच दररोज पाणीपुरवठा सुरू ठेवला, तर हा साठा ऑगस्ट अखेरपर्यंत पुरवणे कठीण होणार आहे. म्हणूनच, दिवसाआड पाणीपुरवठा करून महिन्याला सव्वा टीएमसी पाणी वापरण्याचे उद्दिष्ट ठेवण्यात आले आहे. या पाणीकपातीमुळे पुढील तीन ते चार महिन्यांत जवळपास दीड टीएमसी पाण्याची बचत होऊ शकते, जी मान्सून लांबल्यास शहरासाठी अत्यंत महत्त्वाची ठरणार आहे.
या पार्श्वभूमीवर महापालिका आयुक्त नवल किशोर राम यांनी बुधवारी पाणीपुरवठा विभागाची बैठक घेऊन परिस्थितीचा आढावा घेतला. बैठकीत पाणीकपातीच्या विविध पर्यायांवर चर्चा झाली असून लोकप्रतिनिधींशी चर्चा केल्यानंतर पुढील आठवड्यात निर्णय होण्याची शक्यता आहे. मान्सूनला होणारा विलंब आणि कमी पावसाच्या अंदाजामुळे प्रशासनाने आतापासूनच पाण्याच्या नियोजनावर भर दिला आहे.
