Pune Crime News | पुणे : 42 लाखांचे नुकसान केल्याप्रकरणी भारती एअरटेल कंपनी आणि सातव लँडमार्कच्या अजित सातवसह 7 जणांवर गुन्हा दाखल
पुणे : Pune Crime News | आडनावात सार्धम्य असल्याचा गैरफायदा घेऊन पुतण्या असल्याचे भासवुन महिलेच्या पत्त्यावर बनावट सातव लँडमार्क कंपनीची स्थापना केल्याचे दर्शवून त्याद्वारे भारती एअरटेल कंपनीला ऑप्टिक फायबर वायर टाकण्यास परवानगी दिली. त्यांच्याकडून १७ लाख रुपये घेतले. त्यांनी तयार केलेल्या सिमेंट रोडमधील पाईपमधून वायर टाकून मालमत्तेचे नुकसान करुन त्यांचे ४२ लाखांचे आर्थिक नुकसान केले. सातव लँडमार्कचे अजित सातवसह ७ जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबत निर्मलादेवी प्रतापराव सातव (वय ८१, रा. चंद्रीमा, सहजीवननगर, गणेशखिंड रोड, शिवाजीनगर) यांनी वाघोली पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यावरुन पोलिसांनी सातव लँडमार्कस तर्फे (Satav Landmarks), प्रा. अजित सुरेश सातव Ajit Suresh Satav (रा. वाघोली), संतोष निवृत्ती तांबे Santosh Nivrutti Tambe (वय ३५, रा. बाईफ रोड, वाघोली), सागर जाधव (वय ३६, रा. संत तुकारामनगर, वाघोली), विकास पोखरणा (वय ३८, रा. नॉर्थ टॉवर, ई पार्क, खराडी), भारती एअरटेल (रा. खराडी) व एअरटेल सेंटर गुडगाव, हरियाना) अशी गुन्हा दाखल केलेल्यांची नावे आहेत. हा प्रकार वाघोली येथे ऑक्टोबर २०१८ ते ४ सप्टेंबर २०२६ दरम्यान घडला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी यांची मुलगी वैशाली भरत तिवारी ही फिर्यादी यांची कुलमुखत्यारधारक आहे. वाघोली येथे गट ५६९ व ५७० ही मिळकत त्यांच्या मालकी हक्काची आहे. या मिळकतीवर त्यांनी २०१५ मध्ये टोपाज होम्स एल एल पी आणि मॅजेस्टिक बिल्डर या दोन विकसकांना विकसनासाठी दिली आहे. या मिळकतीच्या विकसनासाठी त्यांनी स्वत: भावडी रोड व अहिल्यानगर महामार्गापर्यंत सिमेंटचा रस्ता करुन घेतला व आजपर्यंत त्यांच्या मालकीचा आहे. २०१८ मध्ये या मिळकतीच्या जागेवर दोन वेगवेगळे बिल्डर एकाच जागेवर आजु बाजुला मोठे कन्स्ट्रक्शन करत असताना तेथील वर्दळीचा गैरफायदा घेऊन दोन्ही बिल्डर यांचा एकमेकांविषयी संभ्रम अजित सुरेश सातव, संतोष तांबे, सागर जाधव यांनी केला. या मिळकतीच्या मालकाबद्दल विचारणा करण्यासाठी फिर्यादीकडे गेले होते.
त्यांनी ही मिळकत विकसनासाठी दिली असून त्यामध्ये कोणतेही प्रकारचे वायरिंगचे खोदकाम करण्यास नकार दिला होता. तरीही त्यांनी विकास पोखरणा व भारती एअरटेल कंपनीशी संगनमत करुन फिर्यादीच्या नावावर असलेल्या मिळकत मध्ये सिमेंट रस्त्यालगत टाकलेल्या पाईपद्वारे कोणतीही परवानगीशिवाय मोठ्या इंटरनेटच्या वायर टाकण्याचे काम केले. त्यासाठी अजित सुरेश सातव याने फिर्यादी यांचा पुतण्या असल्याचे भासवुन केवळ आडनाव सातव असल्याचा गैरफायदा घेऊन १ नोव्हेंबर २०१८ रोजी त्यांच्या खोट्या सहीचे संमती असल्याचे कागदावर हाताने लिहले. नोव्हेंबर २०१८मध्ये स्टॅम्प पेपरवर अजित सातव याने खोटे प्रतिज्ञापत्र तयार केले. त्यांच्या मिळकतीमध्ये २ हजार २७५ मीटर ऑप्टिक फायबर केबल टाकण्यास परवानगी असल्याचे लिहून दिले. त्यासाठी फिर्यादी यांच्या पत्त्यावर सातव लँडमार्कस या बोगस फर्मचे बँक खाते उघडले. त्यात भारती एअरटेलकडून १७ लाख ६ हजार २५० रुपयांचा डिमांड ड्राफ्ट घेतला. त्यात १ लाख ८९ हजार ५८३ रुपये टी डी एस कट करुन ही रक्कम देण्यात आली होती. भारती एअरटेल या कंपनीने मिळकतीची कागदपत्रे, मालकीबाबतची कोणतेही कागदपत्रे तपासुन न घेता तसेच ऑप्टिक फायबर केबल टाकण्यासाठी फिर्यादी यांच्याशी कोणताही संपर्क केला नाही. भारती एअरटेलचा कर्मचारी विकास पोखरणा याने बेकायदेशीर कागदपत्रे बनवुन केबल टाकून आजु बाजुला असणार्या सोसायटींना इंटरनेट कनेक्शन पुरवठा केला आहे.
ही बाब फिर्यादी यांना २५ जुलै २०२३ रोजी लक्षात आली. त्यांनी अॅड. विवेक चव्हाण यांच्या मार्फत भारती एअरटेल कंपनीच्या हरियाना मुख्य शाखेला नोटीस पाठविली. तेव्हा त्यांनी पाठवलेल्या कागदपत्रावरुन अजित सातव याने फिर्यादी यांचा पुतण्या असल्याचे भासवुन बनावट सातव लँडमार्क नावाने त्यांच्या पत्त्यावर बनावट फर्म स्थापन केली. कंपनीला ना हरकत पत्र देऊन स्वत: १७ लाख रुपये घेऊन फिर्यादी यांचे ४२ लाख रुपयांचे नुकसान केल्याचे निष्पन्न झाले. सहायक पोलीस निरीक्षक अहिरे तपास करीत आहेत.
