Monsoon Update-Andaman-Konkan | मॉन्सूनचे अंदमानात आगमन; 6 जूनपर्यंत कोकण किनारपट्टीवर धडकण्याची शक्यता, प्रशासनाला सतर्कतेच्या सूचना
कोल्हापूर: Monsoon Update-Andaman-Konkan | नैऋत्य मोसमी वाऱ्यांच्या प्रवासाला वेग आला असून मॉन्सूनने आज (१६ मे) अंदमान-निकोबार बेटांमध्ये अधिकृत प्रवेश केला आहे. अंदमान समुद्र, दक्षिण बंगालचा उपसागर आणि विषुववृत्तीय हिंदी महासागरात निर्माण झालेल्या अनुकूल वातावरणामुळे यंदा मॉन्सूनचा प्रवास वेळेपूर्वी सुरू झाल्याचे चित्र आहे. भारतीय हवामान विभागाच्या अंदाजानुसार, मॉन्सून २६ मेच्या सुमारास केरळमध्ये दाखल होण्याची शक्यता असून, त्यानंतर तो नियोजित वेळेनुसार देशभर पुढे सरकेल.
साधारणपणे मॉन्सून १ जूनपर्यंत केरळमध्ये दाखल होतो. मात्र यंदा तो सुमारे सहा दिवस आधी पोहोचण्याचा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे. गतवर्षी मॉन्सूनने २४ मे रोजी केरळमध्ये प्रवेश केला होता. अंदमानात वेळेपूर्वी पोहोचल्यानंतर आता मॉन्सूनचा पुढील प्रवास केरळमार्गे कोकण किनारपट्टीकडे होणार असून, ६ जूनपर्यंत महाराष्ट्राच्या कोकण भागात पावसाचे आगमन होण्याची शक्यता आहे.
दरम्यान, भारतीय हवामानशास्त्र विभागाने जून ते सप्टेंबर या कालावधीत देशात सरासरीच्या ९२ टक्के पावसाचा अंदाज वर्तवला आहे. एल-निनोच्या प्रभावामुळे यंदाच्या पावसाबाबत संमिश्र परिस्थिती निर्माण होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. जूनमध्ये मुसळधार पावसाची शक्यता असून जुलै आणि ऑगस्टमध्ये पावसाची ओढ जाणवू शकते, असा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे.
या पार्श्वभूमीवर जिल्हाधिकारी डॉ. विजय राठोड यांनी प्रशासनाला पूर आणि दुष्काळ या दोन्ही परिस्थितींसाठी सज्ज राहण्याच्या सूचना दिल्या आहेत. पाणीसाठ्याचे सूक्ष्म नियोजन, आपत्ती व्यवस्थापन आणि पावसाच्या अनिश्चिततेचा विचार करून यंत्रणांनी आतापासून तयारीला लागावे, असे निर्देश त्यांनी दिले आहेत.
