Mumbai Bengaluru Train | मुंबई-बंगळूर वंदे भारत स्लीपर 3 नोव्हेंबरपासून धावणार? पुणे ते बंगळूर प्रवास 5 तासांनी कमी; आठवड्यातून 6 दिवस सेवा प्रस्तावित
पुणे : Mumbai Bengaluru Train | मुंबई ते बंगळूरदरम्यानच्या बहुप्रतीक्षित वंदे भारत स्लीपर एक्सप्रेसची नियमित सेवा ३ नोव्हेंबर २०२६ पासून सुरू होणार असल्याचे वृत्त आहे. या रेल्वेचे उद्घाटन १ नोव्हेंबर रोजी प्रस्तावित असून, महाराष्ट्रातून धावणारी ही पहिली वंदे भारत स्लीपर एक्सप्रेस ठरणार आहे.
या नव्या रेल्वेमुळे पुणे ते बंगळूर प्रवासाचा वेळ सुमारे पाच तासांनी कमी होणार असल्याचे सांगण्यात येत आहे. त्यामुळे प्रवाशांना हा प्रवास अवघ्या १३ तासांत पूर्ण करता येणार आहे.
१ नोव्हेंबरला उद्घाटनपर फेरी
मिळालेल्या माहितीनुसार, १ नोव्हेंबर रोजी सकाळी साडेअकराच्या सुमारास बंगळूर रेल्वे स्थानकावर वंदे भारत स्लीपर एक्सप्रेसचे उद्घाटन होणार आहे.
उद्घाटनपर फेरीदरम्यान रायचूर, यादगीर, कलबुर्गी, सोलापूर आणि पुणे रेल्वे स्थानकांवर गाडीचे स्वागत करण्यात येणार आहे.
ही विशेष रेल्वे रविवारी रात्री अकराच्या सुमारास पुणे स्थानकावर दाखल होण्याची शक्यता आहे. पुण्यात १० ते १५ मिनिटांचा थांबा घेतल्यानंतर रेल्वे पुढील दिवशी पहाटे तीनच्या सुमारास मुंबईत पोहोचेल.
आठवड्यातून सहा दिवस धावणार रेल्वे
प्रस्तावित वेळापत्रकानुसार, ही रेल्वे आठवड्यातून सहा दिवस धावणार आहे. बंगळूरहून दर सोमवारी, तर मुंबईहून दर मंगळवारी रेल्वे सेवा बंद असेल.
बंगळूर ते मुंबई (गाडी क्रमांक २७६५२):
बंगळूरहून सुटणार : सायंकाळी ७:४५
सोलापूरला पोहोचणार : पहाटे ४:२०
पुण्याला पोहोचणार : सकाळी ८:००
मुंबईला पोहोचणार : सकाळी ११:५५
मुंबई ते बंगळूर (गाडी क्रमांक २७६५१):
मुंबईहून सुटणार : रात्री ८:१०
पुण्याला पोहोचणार : रात्री ११:४०
सोलापूरला पोहोचणार : पहाटे ३:००
बंगळूरला पोहोचणार : दुसऱ्या दिवशी दुपारी १२:००
१६ डबे, ८२३ प्रवाशांची क्षमता
या वंदे भारत स्लीपर एक्सप्रेसला एकूण १६ वातानुकूलित डबे असणार असून, ८२३ प्रवाशांची क्षमता असेल.
यामध्ये एसी थ्री टियरचे ११ डबे (६११ बर्थ), एसी टू टियरचे चार डबे (१८८ बर्थ) आणि एसी प्रथम श्रेणीचा एक डबा (२४ बर्थ) असणार आहे.
या नव्या रेल्वेमुळे मुंबई, पुणे, सोलापूर आणि बंगळूरदरम्यानच्या प्रवाशांना जलद, आरामदायी आणि अत्याधुनिक सुविधांनी युक्त प्रवासाचा पर्याय उपलब्ध होण्याची अपेक्षा आहे. मात्र, नियमित सेवेची तारीख आणि अंतिम वेळापत्रक रेल्वेच्या अधिकृत अधिसूचनेनुसार निश्चित होणार आहे.
