PMC Action On PG-Hostel | पुणे : लोहगावातील 11 विनापरवाना पीजी-हॉस्टेल सील; अग्निसुरक्षा यंत्रणेअभावी महापालिकेची मोठी कारवाई
पुणे : PMC Action On PG-Hostel | लोहगावातील निंबाळकरनगर परिसरात आवश्यक परवानग्यांशिवाय आणि अग्निसुरक्षा यंत्रणेविना सुरू असलेल्या ११ पीजी व हॉस्टेलवर पुणे महापालिकेच्या अग्निशमन विभागाने कारवाई करत ते सील केले. तीन ते चार मजली इमारतींमध्ये शंभरहून अधिक विद्यार्थी आणि विद्यार्थिनी राहत असल्याचे तपासणीत आढळून आले.
देशभरात घडलेल्या विविध आगीच्या घटनांच्या पार्श्वभूमीवर पुणे शहरातील रुग्णालये, पीजी, हॉस्टेल आणि क्लासेसचे अग्निसुरक्षा ऑडिट करण्याचे आदेश महापालिका आयुक्त नवलकिशोर राम यांनी अग्निशमन प्रमुख गणेश सोनुने यांना दिले आहेत. त्यानुसार शुक्रवारी (दि. १८) अग्निशमन विभागाने शहरातील पीजी आणि हॉस्टेलची तपासणी सुरू केली.
लोहगाव-निंबाळकरनगर परिसरातील पीजी आणि हॉस्टेलची पाहणी केली असता अनेक ठिकाणी आवश्यक अग्निशमन यंत्रणाच उपलब्ध नसल्याचे अधिकाऱ्यांच्या निदर्शनास आले. तीन ते चार मजली इमारतींमध्ये मोठ्या संख्येने विद्यार्थी राहत असल्याने आग लागल्यास गंभीर जीवितहानी होण्याचा धोका असल्याचे प्रशासनाने नमूद केले.
तपासणीदरम्यान संबंधित आस्थापनांकडे बांधकाम परवानगी, पीजी किंवा हॉस्टेल चालविण्यासाठी आवश्यक मंजुरी, ड्रेनेज, पाणीपुरवठा, स्ट्रक्चरल तसेच अग्निशमन विभागाचे ना हरकत प्रमाणपत्र यांसारख्या आवश्यक परवानग्यांचा अभाव असल्याचे समोर आले.
अधिकाऱ्यांनी पीजीमध्ये राहणाऱ्या विद्यार्थ्यांशीही संवाद साधला. प्राथमिक तपासणीत काही विद्यार्थ्यांना परिसरातील महाविद्यालयांकडून या पीजींचे संदर्भ मिळाल्याचे समोर आले. नियमांचे उल्लंघन करून विद्यार्थ्यांना अशा ठिकाणी पाठविणाऱ्या संबंधित संस्था तसेच जागामालकांविरोधात कायदेशीर कारवाई करण्याचे आदेश देण्यात आले आहेत.
यापुढे पुणे शहरातील शाळा, महाविद्यालये, पीजी, हॉस्टेल आणि रुग्णालयांची अग्निसुरक्षेच्या दृष्टीने नियमित तपासणी करण्यात येणार आहे. नियमांचे पालन न करणाऱ्या आस्थापनांवर कठोर कारवाई केली जाईल. तसेच सर्व ठिकाणी अग्निशमन यंत्रणा कार्यरत आणि सुस्थितीत ठेवण्याच्या सूचनाही प्रशासनाकडून देण्यात आल्या आहेत.
