Pune Festival 2026 : ‘कलाकारांच्या प्रोत्साहनासाठी मान्यवरांनी सांस्कृतिक कार्यक्रमांना उपस्थित राहावे’ – खासदार हेमा मालिनी

Pune Festival

पुणे : Pune Festival 2026 : देशभरात विविध उत्सवांच्या माध्यमातून कला, नाटक, नृत्य आणि संगीत सादर करण्याची संधी कलाकारांना मिळते. मात्र, या कलाकारांना प्रोत्साहन देण्यासाठी देशातील नामांकित व्यक्तींनी सांस्कृतिक कार्यक्रमांना आवर्जून उपस्थित राहणे आवश्यक आहे. कलाकारांचा सन्मान आणि त्यांच्या कलेला मिळणारी दाद त्यांचा आत्मविश्वास वाढवते. पुणे फेस्टिव्हलमध्ये दरवर्षी विविध क्षेत्रांतील कलाकारांचा गौरव केला जातो, ही त्याची विशेष परंपरा आहे, असे मत मथुराच्या खासदार आणि अभिनेत्री हेमा मालिनी यांनी व्यक्त केले.

३८ व्या पुणे फेस्टिव्हलनिमित्त उद्घाटन सोहळ्यात आयोजित पुरस्कार सोहळ्यात त्या बोलत होत्या. पुणे फेस्टिव्हलचे संस्थापक अध्यक्ष व माजी खासदार दिवंगत सुरेश कलमाडी यांच्या स्मृतीस यंदाचा फेस्टिव्हल अर्पण करण्यात आला आहे. यंदापासून सुरू करण्यात आलेल्या ‘संस्थापक सुरेश कलमाडी पुणे फेस्टिव्हल जीवनगौरव पुरस्कारा’ने ज्येष्ठ अभिनेते मोहन जोशी यांचा गौरव करण्यात आला. ज्येष्ठ चित्रपट निर्माते-दिग्दर्शक किरण शांताराम, ज्येष्ठ नाट्यलेखक-दिग्दर्शक अतुल पेठे, भारतीय महिला हॉकी संघटनेच्या माजी अध्यक्षा अर्णवाज दमानिया आणि फ्लाइंग ऑफिसर निधी सुधीर अगरवाल यांनाही ‘पुणे फेस्टिव्हल पुरस्कार’ देऊन सन्मानित करण्यात आले. निधी अगरवाल यांच्या वतीने त्यांच्या कुटुंबीयांनी पुरस्कार स्वीकारला.

सार्वजनिक गणेशोत्सवाची शताब्दी साजरी करणाऱ्या रणमर्द शिवाजी मंडळ आणि श्री हनुमान मंडळ प्रतिष्ठानचाही सन्मान करण्यात आला. यावेळी उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार, मंत्री चंद्रकांत पाटील, पुणे फेस्टिव्हलच्या अध्यक्षा मीरा कलमाडी आणि अध्यक्ष कृष्णकुमार गोयल उपस्थित होते. कृष्णकुमार गोयल यांच्या गौरवग्रंथाचे प्रकाशनही मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले.

‘तुमच्या प्रेमळ शहरात येऊन आनंद झाला’

‘तुमच्या प्रेमळ शहरात येऊन मला आनंद झाला,’ असे मराठीत सांगत हेमा मालिनी यांनी पुण्याशी असलेले आपले ऋणानुबंध अधोरेखित केले. त्या म्हणाल्या, ‘‘गेल्या ३० वर्षांपासून मी पुणे फेस्टिव्हलशी जोडलेली आहे. सुरेश कलमाडी यांनी मला या व्यासपीठावर कला सादर करण्याची संधी दिली. गणेशोत्सवाच्या निमित्ताने विविध कला सादर केल्या आणि पुणेकर रसिकांचे भरभरून प्रेम मिळाले. कलमाडी यांनी मला सातत्याने प्रोत्साहन दिले. देशातील अनेक दिग्गज कलाकार या फेस्टिव्हलमध्ये सहभागी झाले असून त्यामुळे या उत्सवाची दखल जगभर घेतली जात आहे.’’

‘उत्सवाच्या स्वरूपावरून दोन प्रवाह’

मंत्री चंद्रकांत पाटील म्हणाले, ‘‘गणेशोत्सव कसा साजरा करायचा, यावर आज दोन प्रवाह दिसतात. मोठा डीजे, डॉल्बी, प्लाझ्मा आणि लेझर लावून उत्सव साजरा करण्याची एक पद्धत आहे; तर कला-संस्कृतीचा उत्सव म्हणून पुणे फेस्टिव्हल साजरा करण्याची दुसरी परंपरा आहे. लोकमान्य टिळकांना अभिप्रेत असलेला सामाजिक आणि सांस्कृतिक आशयाचा गणेशोत्सव पुढे नेण्याच्या उद्देशाने सुरेश कलमाडी यांनी पुणे फेस्टिव्हलची निर्मिती केली.’’

‘३८ हा केवळ आकडा नाही, सांस्कृतिक परंपरा’

पुणे फेस्टिव्हलचे अध्यक्ष कृष्णकुमार गोयल म्हणाले, ‘‘कोणताही उत्सव आपोआप लोकोत्सव होत नाही. त्यामागे कार्यकर्त्यांची मोठी फळी आणि सातत्याने काम करणारे हात असतात. सुरेश कलमाडी यांनी या उत्सवाची धुरा यशस्वीपणे सांभाळली. पुणे फेस्टिव्हल पक्षविरहित राहिला असून पुणेकरांनी हा उत्सव डोक्यावर घेतला आहे. आज हा ब्रँड जगभर पोहोचला असून विविध देशांतील नागरिकही या उत्सवात सहभागी होत आहेत.’’

यंदा येरवडा कारागृहातील कैद्यांनी तयार केलेली गणेशमूर्ती पुणे फेस्टिव्हलमध्ये प्रतिष्ठापित करण्यात आली आहे. तसेच नेत्रदानाबाबत जनजागृतीही केली जात आहे. यावर्षीपासून सुरेश कलमाडी जीवनगौरव पुरस्कार सुरू करण्यात आला आहे. ‘पुणे फेस्टिव्हल’ हा केवळ ३८ वर्षांचा आकडा नसून पुण्याची संस्कृती समृद्ध करण्याची सातत्यपूर्ण परंपरा आहे. कलाकार केवळ समाजाचे मनोरंजन करत नाही, तर आपल्या कलेच्या माध्यमातून समाजाचे प्रबोधन करून प्रत्येकाला स्वतःकडे पाहण्याची दृष्टी देतो, असे गोयल यांनी सांगितले.

यंदाच्या पुणे फेस्टिव्हलमध्ये ५० हून अधिक सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले असून हे कार्यक्रम विनामूल्य असल्याचे आयोजकांनी सांगितले.

You may have missed