Pune ACB News | उत्पन्नापेक्षा 2 कोटी 78 लाख रुपयांची अपसंपदा बाळगणार्या सहायक नगर रचनाकार विकास ढेकळे याच्यासह पत्नीवर गुन्हा दाखल
पुणे : Pune ACB News | सहायक नगर रचनाकार विकास ढेकळे याने त्याच्या उत्पन्नापेक्षा अधिक २ कोटी ७८ लाख ४१ हजार ५४२ रुपये (१८ टक्के) इतकी अपसंपदा भ्रष्ट मार्गाने धारण केली. त्यांना साथ देणार्या पत्नीवरही लाच लुचपत प्रतिबंधक विभागाने गुन्हा दाखल केला आहे.
विकास किसन ढेकळे Vikas Kisan Dhekale (वय ५०, रा. पर्ल टॉवर, गाडीतळ, हडपसर) आणि भाग्यश्री विकास ढेकळे अशी गुन्हा दाखल झालेल्यांची नावे आहेत. हडपसर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
नगर रचना विभागाचे सहायक नगर रचनाकार विकास ढेकळे याच्याविरुद्ध उघड चौकशीचा आदेश लाच लुचपत प्रतिबंधक विभागाला मिळाला होता. ही चौकशी सुरु असताना गेल्या वर्षी त्यांच्याविरुद्ध लाचेच्या मागणीबाबत तक्रार प्राप्त झाली होती. त्यात सापळा कारवाई करण्यात आली होती. बारामती शहर पोलीस ठाण्यात २० मार्च २०२५ रोजी गुन्हा दाखल करण्यात आला होता. विकास ढेकळे याच्या मालमत्तेच्या उघड चौकशीमध्ये १७ ऑगस्ट १९९९ ते २० मार्च २०२५ दरम्यानचे परिक्षण कालावधीमध्ये ढेकळे याने आपल्या उत्पन्नापेक्षा २ कोटी ७८ लाख ४१ हजार ५४२ रुपये (१८ टक्के) इतकी अपसंपदा बाळगल्याचे उघड चौकशीत दिसून आले. ही अपसंपदा भ्रष्ट मार्गाने धारण करण्यासाठी त्यांची पत्नी भाग्यश्री ढेकळे यांनी प्रोत्साहन दिले आहे. या उघड चौकशी दरम्यान बनावट पावत्या सादर केल्या आहेत, त्यामुळे त्यांच्याविरुद्ध हडपसर पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदविण्यात आला आहे.
पोलीस अधीक्षक शिरीष सरदेशपांडे, अपर पोलीस अधीक्षक अजित पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उप अधीक्षक मनीषा झेंडे यांनी ही उघड चौकशी केली. पोलीस उप अधीक्षक सतिश वाळके तपास करीत आहेत.
विलक्षण योगायोग
यापूर्वी नगर रचना विभागाचे सहसंचालक हनुमंत नाझीरकर यांच्यावरही अपसंपदा बाळगल्याप्रकरणी कारवाई झाली होती. नाझीरकर कुटुंबीयाच्या नावावर ५३ स्थावर मालमत्ता, ३७ कंपन्या, १५० बँक खाती आढळून आली असून लाच लुचपत प्रतिबंधक विभागाने या तपासात त्यांची ५५ कोटी रुपयांची मालमत्ता जप्त केली आहे. त्यांच्यावर ४० हजार पानांचे दोषारोप पत्र दाखल करण्यात आले आहे. हा तपास करणारे लाच लुचपत प्रतिबंधक विभागाचे तत्कालीन पोलीस निरीक्षक गिरीश सोनवणे यांना नुकतेच केंद्रीय गृहमंत्री यांचे दक्षता पदक मिळाले आहे़.
