Pune ACB Trap Case | अनुदानाची फाईल विभागीय कार्यालयात पाठविण्यासाठी लाच घेताना महात्मा फुले मागासवर्गीय विकास महामंडळाचा जिल्हा व्यवस्थापक, सहायक लेखा अधिकारी अटकेत

Pune ACB Trap Case

पुणे : Pune ACB Trap Case | मागासवर्गीयांना व्यवसासासाठी महात्मा फुले मागासवर्गीय विकास महामंडळाकडून ५० हजार रुपयांचे अनुदान देण्यात येते. फोटोग्राफी व्यवसायासाठी आवश्यक असलेला ३ लाखांचा कॅमेरा खरेदीसाठी हे ५० हजार रुपयांचे अनुदान मिळावे, यासाठी केलेल्या अर्जाची फाईल मंजूर करुन ती विभागीय कार्यालयाकडे पाठविण्यासाठी १५ हजार रुपयांची लाच घेताना लाच लुचपत प्रतिबंधक विभागाने सापळा रचून सहायक लेखा अधिकारी व जिल्हा व्यवस्थापकाला अटक केली आहे. (Pune Bribe Case)

जिल्हा व्यवस्थापक महेंद्र मलेशा माने Mahendra Malesha Mane (वय ५६, रा. पी जी बॉईज हॉस्टेल, पुणे -आळंदी रोड, विश्रांतवाडी, मुळ रा. सोलापूर), सहायक लेखा अधिकारी संतोष नामदेव शिंदे Santosh Namdev Shinde (वय ५५, रा. सनगौरी अपार्टमेंट, कुंबरे टाऊनशिप, कोथरुड) अशी अटक केलेल्यांची नावे आहेत.

तक्रारदार हे फोटोग्राफर असून त्यांना व्यवसायासाठी ३ लाख रुपयांचा कॅमेरा खरेदी करायचा होता. त्यासाठी त्यांनी कॅनरा बँकेमध्ये कर्ज प्रकरण केले होते. महात्मा फुले मागासवर्गीय विकास महामंडळाकडून मागासवर्गीय लोकांना व्यवसायासाठी ५० हजार रुपये अनुदान देण्यात येते. त्यासाठी तक्रारदार यांनी  सप्टेंबर २०२५ मध्ये अर्ज केला होता. महेंद्र माने हे जिल्हा व्यवस्थापक आहेत. संतोष शिंदे हे सहायक लेखा अधिकारी असून महामंडळाकडे   लाभार्थींनी दाखल केलेल्या प्रकरणांमध्ये साईट व्हिजिट करुन लाभार्थींकडून आवश्यक त्या कागदपत्रांची पूर्तता करुन घेऊन जिल्हा व्यवस्थापक महेंद्र माने यांच्या शिफारशीनंतर ते प्रकरण अनुदान मंजुरीसाठी महामंडळाच्या विभागीय कार्यालयात पाठविण्याचे काम करतात.

या दोघांनी तक्रारदाराने दाखल केलेल्या अनुदानाचे प्रकरण सकारात्मक शिफारशीसह महात्मा फुले मागासवर्गीय महामंडळाच्या विभागीय कार्यालयात पाठविण्यासाठी तक्रारदाराकडे २० हजार रुपयांच्या लाचेची मागणी केली. त्याची तक्रार ३० जानेवारी रोजी लाच लुचपत प्रतिबंधक विभागाला मिळाली. त्याची ४ व ५ फेब्रुवारी रोजी पडताळणी करण्यात आली. तडजोडीअंती १५ हजार रुपयांची लाचेची मागणी करण्यात करण्यात आल्याचे निष्पन्न झाले. त्यानंतर ५ मार्च रोजी सायंकाळी रास्ता पेठेतील आपोलो चौकातील कॅफेसमोर सापळा रचण्यात आला. संतोष शिंदे याने सायंकाळी ७ वाजता तक्रारदार यांच्याकडून १५ हजार रुपये लाच स्वीकारताना पकडण्यात आले. त्यानंतर महेंद्र माने याला त्याच्या राहत्या घरातून ताब्यात घेण्यात आले.

दोघांना शुक्रवारी विशेष न्यायालयात हजर करण्यात आले. न्यायालयाने अधिक तपासासाठी ९ मार्चपर्यंत पोलीस कोठडी मंजूर केली आहे. ही कारवाई पोलीस अधीक्षक शिरीष सरदेशपांडे, अपर पोलीस अधीक्षक अजित पाटील, अर्जुन भोसले यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक प्रसाद लोणारे व त्यांच्या सहकारी यांनी केली़ पोलीस निरीक्षक खंडेराव रंजवे तपास करीत आहेत.

You may have missed