Pune ACB Trap Case | बारामतीत तलाठी, मंडल अधिकार्‍यांसाठी लाच घेणारा मध्यस्थ गजाआड; सातबारा उतार्‍यावर नोंदणीसाठी 15 हजारांची लाच स्वीकारताना कारवाई

Pune ACB Trap Case

पुणे : Pune ACB Trap Case | बारामतीतील निंबूत कार्यालयातील तलाठी आणि मंडल अधिकार्‍याच्या नावे शेतकर्‍याकडून १५ हजार रुपयांचा लाच घेणार्‍या मध्यस्थाला लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने अटक केली. मध्यस्थाने तलाठी आणि मंडल अधिकार्‍यांच्या नावे सुरुवातीला २० हजार रुपयांची लाच मागितली होती.

सोमनाथ संपत महानवर Somnath Sampat Mahanavar (वय ३५, रा. गडदरवाडी, खंडोबाची वाडी, ता. बारामती) असे अटक करण्यात आलेल्याचे नाव आहे. महानवर याच्या विरुद्ध बारामती तालुक्यातील वडगाव निंबाळकर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

तक्रारदार हे शेतकरी आहेत. तक्रारदाराची बारामतीतील निंबूत परिसरात सहा गुंठे जमीन आहे. बारामतीतील भूमी अभिलेख कार्यालयाकडून मोजणी करण्यात आली आहे. जमिनीची फाळणी केल्यानंतर सातबारा उताºयावर नोंद करण्यासाठी तहसीलदारांनी पत्र दिले होते. तक्रारदार हे निंबूत येथील तलाठी कार्यालयात गेले. तेव्हा कार्यालयात वावरणारा मध्यस्थ सोमनाथ महानवर याने सातबार्‍यावरील एका नोंदीसाठी प्रत्येकी ५ हजार रुपये असे २० हजार रुपये तलाठी जयश्री तनपुरे, मंडल अधिकारी मोहिते यांना द्यावे लागतील, असे सांगितले.

शेतकºयाने दिलेल्या तक्रारीची लाच लुचपत प्रतिबंधक विभागाच्या अधिकार्‍यांकडून पडताळणी करण्यात आली. तेव्हा मध्यस्थ महानवर याने तलाठी आणि मंडल अधिकार्‍याच्या नावे लाच मागितल्याचे निष्पन्न झाले. ३ मार्च रोजी तक्रारदाराने महानवर याच्याकडे विचारणा केली. तेव्हा चार गुंठे जमिनीची सातबारा उतार्‍यावर नोंदणी करण्यात आली असून, पैसे पाठवा, असा संदेश तक्रारदाराला महानवर याने पाठविला. त्यानुसार बुधवारी (४ मार्च) बारामती – नीरा रस्त्यावर खंडोबाची वाडी येथे लाच लुचपत प्रतिबंधक अधिकार्‍यांनी सापळा लावला. तक्रारदाराकडून १५ हजारांची लाच घेताना महानवर याला पकडण्यात आले. चौकशीत महानवर हा तलाठी कार्यालयातील कर्मचारी नसल्याचे उघड झाले.

ही कारवाई पोलीस अधीक्षक शिरीष सरदेशपांडे, अपर पोलीस अधीक्षक अजित पाटील, अर्जुन भोसले यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक आसावरी शेडगे आणि पथकाने केली. पोलीस निरीक्षक सुहास हट्टेकर तपास करत आहेत.

You may have missed