Pune ACB Trap Case | नोकरीवर असताना केलेल्या कामाचा मोबदला सेवानिवृत्तीनंतर घेताना विस्तार अधिकारी, ग्राम विकास अधिकार्‍यासह तिघांना अटक

Pune ACB Trap Case

पुणे : Pune ACB Trap Case | घरकुल योजना मंजूर करताना त्या फाईलवर चौकशी केली, त्याचा सेवानिवृत्त झाल्यानंतर मोबदला घेताना विस्तार अधिकारी, ग्रामविकास अधिकार्‍यासह तिघांना लाच लुचपत प्रतिबंधक विभागाने सापळा रचून पकडले.

ग्राम विकास अधिकारी महादेव नामदेव सालगुडे Mahadev Namdev Salgude (वय ४८, रा. तेज बिल्डिंग, भोलावडे, ता. भोर), सेवानिवृत्त विस्तार अधिकारी दत्तात्रेय दादासाहेब खंडाळे Dattatreya Dadasaheb Khandale (वय ५८, रा. श्रीकृष्ण अपार्टमेंट, रुई, ता. बारामती), खासगी व्यक्ती किसन रामचंद्र ठोसर Kisan Ramchandra Thosar (वय ५२, रा. शिंद, ता. भोर) अशी अटक केलेल्यांची नावे आहेत.

तक्रारदार हे शेतकरी असून त्यांना २०२४ -२५ मध्ये महाराष्ट्र शासनातर्फे घरकुल मंजूर झाले आहे. त्यांना २८ फेब्रुवारी २०२६ रोजी घरकुल योजनेचा पहिला हफ्ता त्यांच्या बँक खात्यात जमा झाला आहे. त्यानंतर तक्रारदार यांनी त्यांच्या घराचे बांधकाम सुरु केले. फाउंडेशन पर्यंत काम पूर्ण केले. त्यानुसार ग्रामविस्तार अधिकारी सालगुडे यांना तक्रारदार यांच्या घराच्या बांधकामचे इंजिनिअरमार्फत फोटो काढून पंचायत समिती भोर येथे अहवालाने सादर केले.


तक्रारदार हे १ एप्रिल २०२६ रोजी त्यांच्या घरकुलच्या दुसर्‍या हफ्त्याची चौशी करण्याकरीता पंचायत समितीमध्ये गेले. त्या ठिकाणच्या क्लार्ककडून तक्रारदार यांना त्यांच्या गवडी गावचे ग्रामसेवक सालगुडे यांनी त्यांचा घरकुलाचा दुसरा हफ्ता प्रलंबित ठेवण्यास सांगितले असल्याचे समजले. म्हणून तक्रारदार यांनी सालगुडे यांची भेट घेतली. सालगुडे याने तक्रारदार यांच्या घरकुलाचा दुसरा हफ्ता खात्यामध्ये जमा करण्याकरीता ५ हजार रुपयांची लाच मागितली.

तक्रारदार यांनी ६ एप्रिल २०२६ रोजी लाच लुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार केली. या तक्रारीची पडताळणी ९ एप्रिल रोजी केली़ त्यात महादेव सालगुडे याने तक्रारदार यांच्याकडे त्यांच्या घरकुलाचा दुसरा हफ्ता खात्यामध्ये जमा करण्यासाठी सेवानिवृत्त विस्तार अधिकारी खंडाळे व गोगरे यांच्या करीता प्रत्येकी ५ हजार रुपये असे त्याच्या स्वत: करीता ५ हजार असे एकूण १५ हजार रुपयांची मागणी केल्याचे निष्पन्न झाले.

सेवानिवृत्त विस्तार अधिकारी खंडाळे आणि गोगरे हे कोण आहेत, यांचा तक्रारदाराच्या घरकुंलाच्या प्रस्तावाशाी काय संबंध आहे, याबाबत तक्रारदाराकडून माहिती घेतली असता त्यांनी हे दोन्ही घरकुलाच्या प्रस्तावाची चौकशी त्यांच्याकडे देण्यात आली होती, अशी माहिती मिळाली. त्यानंतर सेवानिवृत्त विस्तार अधिकारी खंडाळे याच्याकडे पडताळणी केली असता खंडाळे यांनी तक्रारदार यांना ग्रामविकास अधिकारी सालगुडे याला ५ हजार रुपये लाच देण्यास प्रोत्साहन दिल्याचे निष्पन्न झाले.

तक्रारदार हे २२ एप्रिल रोजी ५ हजार रुपये घेऊन सालगुडे यांना भेटले. त्यावेळी सालगुडे याने तक्रारदार यांच्याकडे १५ हजार रुपये आहेत का?, अशी विचारणा केली. त्यावर तक्रारदार यांनी ५ हजार रुपये आणले असल्याचे सांगितले होते. त्यावर सालगुडे ५ हजारात काम होणार नाही, १५ हजार रुपये द्यावे लागतील, असे सांगितले. त्यानंतर तक्रारदार यांच्याकडे लाच मागणी केल्यानंतर १९ मे रोजी भोर – मोहोरडे रोड लगत किवत गावात सापळा रचण्यात आला. तक्रारदार हे १५ हजार रुपये घेऊन महादेव सालगुडे याच्याकडे देऊ केली असता त्याने ती रक्कम किसन ठोसर याच्याकडे देण्यास सांगितले. किसन ठोसर याने तक्रारदाराकडून १५ हजार रुपये स्वीकारल्यावर दोन्ही आरोपींना किवत गावात दुपारी पकडण्यात आले. पाठोपाठ खंडाळे याला ताब्यात घेण्यात आले. भोर पोलीस ठाण्यात त्यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करुन तिघांना अटक करण्यात आली.

ही कारवाई पोलीस अधीक्षक शिरीष सरदेशपांडे, अपर पोलीस अधीक्षक अजित पाटील, अर्जुन भोसले यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक आसावरी शेडगे व त्यांचे सहकारी यांनी केली़ सहायक पोलीस आयुक्त निता मिसाळ तपास करीत आहेत.  

You may have missed