Pune Accident News | पुणे : भरधाव कारची धडक बसून सॉफ्टवेअर इंजिनिअरचा मृत्यु; पाषाण येथील DRDO रोडवरील शनिवार सकाळची घटना
पुणे : Pune Accident News | सकाळी व्यायामासाठी रस्त्याने जात असताना पाठीमागून आलेल्या भरधाव कारने तरुणाला जोरात धडक दिली़ त्यात सॉफ्टवेअर इंजिनिअरचा मृत्यु झाला. त्यानंतर कार बाजूला जाऊन धडकल्याने त्यात कारचालक तरुणही ही जखमी झाला.
विरेंद्र राघवेंद्र प्रसाद द्विवेदी (वय ४८, रा. गुलमोहर प्लाझा, विवेकानंद सोसायटी, पाषाण) असे मृत्यु पावलेल्या तरुणाचे नाव आहे. ईशान विशाल सेठिया (वय १९, रा. वडगाव शेरी) असे कारचालकाचे नाव आहे. या अपघातात तोही जखमी झाला असून त्याच्यावर रुग्णालयात उपचार करण्यात येत आहे. याबाबत धिरेंद्र राघवेंद्र प्रसाद द्विवेदी (वय ४३) यांनी चतु:श्रृंगी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, विरेंद्र द्विवेदी हे सॉफ्टवेअर इंजिनिअर असून ते मुळचे मध्यप्रदेशचे राहणारे आहेत. पुण्यात नोकरी करतात. ते नेहमीप्रमाणे सकाळी फिरायला बाहेर पडले होते. पाषाण सर्कलकडून बावधनकडे जाणार्या डिआरडीओ रोडवरुन ते चालत जात होते. सकाळी ७ वाजण्याच्या सुमारास ते हनुमान मंदिरसमोरील नेकलेस गार्डन येथे आले असताना भरधाव जाणार्या इनोव्हा कारने त्यांना जोरात धडक दिली. धडक बसल्याने विरेंद्र द्विवेदी जागीच कोसळले. अपघातानंतर गाडी कडेला जाऊन धडकल्याने त्यात कारचालक ईशान सेठिया हा ही जखमी झाला. अपघाताचा आवाज ऐकून आजूबाजूच्या ठिकाणचे काही सुरक्षारक्षक धावून आले. त्यांच्या मदतीने विरेंद्र द्विवेदी यांना ईशान सेठिया याच्या कारमधून रुग्णालयात नेण्यात आले. डॉक्टरांनी तपासणीपूर्वीच विरेंद्र यांचा मृत्यु झाल्याचे सांगितले. ईशान सेठिया याच्यावर उपचार करण्यात येत आहे. ईशान सेठिया याचे वडिल एका बांधकाम व्यावसायिकाच्या कंपनीत लिगल डिपार्टमेंटमध्ये नोकरी करतात.
विरेंद्र द्विवेदी यांचे आई वडिल हे मध्य प्रदेशातून पुण्याला येण्यास निघाले आहेत. ते पुण्यात आल्यानंतर शवविच्छेदन करण्यात येणार आहे. पोलिसांनी अपघातातील कार जप्त केली आहे. असे पोलीस उपायुक्त रजनीकांत चिलुमुला यांनी सांगितले.
