Pune Accident News | संगमवाडीत भरधाव कारची दुचाकीला धडक; फूड डिलिव्हरी कर्मचाऱ्याचा मृत्यू
पुणे : Pune Accident News | संगमवाडी परिसरात भरधाव कारने दुचाकीला दिलेल्या जोरदार धडकेत फूड डिलिव्हरीचे काम करणाऱ्या 52 वर्षीय व्यक्तीचा मृत्यू झाला. या प्रकरणी येरवडा पोलिस ठाण्यात कारचालकाविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
मृत व्यक्तीचे नाव प्रेमनाथ रामकृष्ण वानखेडे (वय 52, रा. सिद्धी टॉवर्स, दापोडी) असे असून, याबाबत त्यांचा मुलगा करण वानखेडे यांनी तक्रार दाखल केली आहे. त्यानुसार प्रिशा मोहिनीश थडाणी Prisha Mohinish Thadani (रा. कल्याणीनगर) यांच्या विरोधात गुन्हा नोंदविण्यात आला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, 12 मे रोजी दुपारी साडेदोनच्या सुमारास हा अपघात घडला. प्रेमनाथ वानखेडे हे फूड डिलिव्हरीचे काम करून दुचाकीवरून दापोडीकडे जात असताना भरधाव कारने त्यांच्या दुचाकीला धडक दिली. या अपघातात ते गंभीर जखमी झाले.
अपघातानंतर त्यांना तातडीने खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र उपचार सुरू असतानाच त्यांचा मृत्यू झाला. घटनेनंतर येरवडा पोलिसांनी अपघाताची नोंद करून संबंधित कारचालकाविरोधात गुन्हा दाखल केला असून, सीसीटीव्ही फुटेज आणि इतर पुराव्यांच्या आधारे पुढील तपास सुरू आहे.
