Pune Congress News | पुणे : काँग्रेसच्या शहर अध्यक्षपदी प्रशांत जगताप आणि दिप्ती चवधरी
पुणे : Pune Congress News | गेली काही वर्षे प्रभारी अध्यक्षपदावर कारभार सुरू असलेल्या शहर काँग्रेसला अखेर शहराध्यक्ष लाभले आहेत. महापालिका निवडणुकीपूर्वी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षातून काँग्रेसमध्ये दाखल झालेले माजी महापौर प्रशांत जगताप आणि काँग्रेसच्या माजी आमदार दिप्ती चवधरी यांच्याकडे शहर अध्यक्षपदाची सूत्रे देण्यात आली आहेत.
अखिल भारतीय काँग्रेस कमिटीने विधानसभा आणि स्थानिक स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीतील पराभवानंतर काँग्रेसने तीन वर्षांनी होणाऱ्या लोकसभा निवडणुकीच्या दृष्टीने आतापासूनच संघटना बांधणीसाठी तयारी सुरू केली आहे. राज्यातील सर्व शहर आणि जिल्ह्यांमध्ये भाकरी फिरवली आहे. पुणे शहर, पिंपरी चिंचवड महापालिका आणि जिल्ह्याच्या अध्यक्ष पदांसाठी रात्री उशिरा प्रमुखांची नियुक्ती जाहीर केली आहे. पुणे शहरासाठी दोन शहर अध्यक्षांची नियुक्ती करताना शहराच्या पूर्व भागासाठी आणि पश्चिम भागासाठी दोन शहराध्यक्ष नियुक्त केले आहेत.
दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेसच्या विलीनीकरणाच्या चर्चेमुळे व्यथित होऊन महापालिका निवडणुकीपूर्वी काँग्रेसमध्ये प्रवेश केलेले प्रशांत जगताप यांच्याकडे पूर्व पुण्याची जबाबदारी देण्यात आली आहे. तर माजी आमदार दिप्ती चवधरी यांच्याकडे शहर पश्चिमची जबाबदारी देण्यात आली आहे. पिंपरी चिंचवडच्या शहर अध्यक्षपदी नरेंद्र बनसोडे यांची नियुक्ती करण्यात आली आहे. पुणे जिल्ह्याच्या उत्तर जिल्हाध्यक्षपदी कमलाकर सातव तर दक्षिण जिल्हाध्यक्ष पदी लहू निवंगुणे यांची नियुक्ती करण्यात आली आहे. माजी आमदार रमेश बागवे यांच्यानंतर २०२२ मध्ये अरविंद शिंदे यांच्याकडे प्रभारी अध्यक्षपद देण्यात आले होते. परंतु भाजपच्या झंझावातपुढे शिंदे यांचा टिकाव लागू शकला नाही. लोकसभा, विधानसभा निवडणुकीत पक्षाला पराभवाला सामोरे जावे लागले. यावर्षी महापालिका निवडणुकीपूर्वी काँग्रेस मध्ये दाखल झालेल्या प्रशांत जगताप यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या शहर अध्यक्ष पदाच्या बांधणीमुळे बऱ्याच वर्षात अस्तित्व गमावून बसलेल्या काँग्रेसला मागील निवडणुकीपेक्षा पाच जागा अधिक मिळाल्या. काँग्रेसला मिळालेल्या १५ जागांपैकी सात जागांवरील विजयात जगताप यांचा मोलाचा वाटा आहे.
याउलट काँग्रेसच्या अंतर्गत गटबाजी मुळे काँग्रेसच्या ज्येष्ठ नगरसेवकांना पराभव स्वीकारावा लागला. अन्यथा काँग्रेसच्या किमान तीन ते चार जागा वाढल्या असत्या असे काँग्रेसचे कार्यकर्ते बोलत आहेत. दरम्यान राष्ट्रवादी काँग्रेसचे शहर अध्यक्ष पद सांभाळताना प्रशांत जगताप यांनी संपूर्ण शहरात संघटन बांधणी केली होती. शहरातील सर्वच भागातील कार्यकर्त्यांच्या नियमित भेटी, बैठका आणि विविध भागात सातत्यपूर्ण आंदोलन यामुळे जगताप संपूर्ण शहरात परिचित आहेत. तुलनेने मागील काही वर्षात शहर काँग्रेस केवळ काँग्रेस भवन ते बालगंधर्व रंगमंदिर चौकापर्यंतच्या अर्ध्या किमीच्या वर्तुळातच अस्तित्व दाखवत होती, असेही कार्यकर्ते म्हणू लागले आहेत. जगताप यांच्या नियुक्तीने शहर काँग्रेसला बळकटी मिळेल असा विश्वास कार्यकर्ते व्यक्त करत आहेत. दुसरीकडे शहर अध्यक्ष पदी बऱ्याच वर्षांनी माजी आमदार दिप्ती चवधरी यांच्या रूपाने महिलेला संधी देत पक्षाने बॅलन्स राखल्याचं बोलले जात आहे.
