Pune Crime Court News | पुणे : 28 कोटींच्या जमीन घोटाळ्यातील मुख्य आरोपी चंद्रकांत रामचंद्र सांगलीकर याचा जामीन अर्ज पुन्हा फेटाळला

Pune Crime Court News | Pune: Bail application of Chandrakant Ramchandra Sanglikar, the prime accused in the ₹28 crore land scam, rejected again.

पुणे : Pune Crime Court News | गुंतवणूकदारांना जास्त परताव्याचे आमिष दाखवून जमिनींच्या व्यवहारातून तब्बल २८ कोटी रुपयांचा घोटाळा केल्याप्रकरणातील मुख्य आरोपी चंद्रकांत रामचंद्र सांगलीकर (Chandrakant Ramchandra Sanglikar) याचा जामीन अर्ज अतिरिक्त सत्र न्यायाधीश एस. एस. कंठाळे यांनी फेटाळला. कंपनीचा एजंट म्हणून काम पाहणाऱ्या सांगलीकरचा जामीन अर्ज दुसऱ्यांदा नामंजूर करण्यात आला आहे.

मागील पाच महिन्यांपासून न्यायालयीन कोठडीत असलेला आणि येरवडा कारागृहात असलेला सांगलीकर याने सत्र न्यायालयात जामिनासाठी अर्ज दाखल केला होता. या अर्जाला सरकारी वकील मारुती वाडेकर यांनी जोरदार विरोध केला.

तपासात समोर आलेल्या माहितीनुसार, पीएसीएल कंपनीमार्फत गुंतवणूकदारांकडून अधिक परताव्याचे आश्वासन देत पैसे गोळा करण्यात आले होते. या निधीतून राज्यातील विविध भागांत जमिनी खरेदी करण्यात आल्या. सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानुसार या जमिनींच्या खरेदी-विक्रीसाठी लोढा समितीची परवानगी आवश्यक होती. मात्र, काही एजंट आणि भागीदारांनी संगनमत करून जमिनींची विक्री करत मोठा आर्थिक लाभ मिळवल्याचा आरोप आहे.

या प्रकरणी बावधन पोलिस ठाणे तसेच आर्थिक गुन्हे शाखेकडे अनेक तक्रारी दाखल आहेत. आरोपीला जामीन मंजूर झाल्यास तो पुन्हा अशा प्रकारचे व्यवहार करू शकतो किंवा साक्षीदारांवर दबाव टाकण्याची शक्यता असल्याचा युक्तिवाद सरकारी पक्ष आणि तक्रारदारांच्या वकिलांकडून करण्यात आला.

दोन्ही बाजूंचा युक्तिवाद ऐकल्यानंतर न्यायालयाने आरोपीचा जामीन अर्ज फेटाळत सरकारी पक्षाचा आक्षेप ग्राह्य धरला.

You may have missed