Anil Balwadkar | धोंडे जेवणात सासऱ्यांचा सन्मान ! पुण्यात अनोखा सामाजिक उपक्रम (Video)
पुणे : Anil Balwadkar | अधिक मासानिमित्त जावयांना घरी जेवणासाठी निमंत्रित करून त्यांचा सन्मान करण्याची परंपरा आपल्या संस्कृतीत अनेक वर्षांपासून प्रचलित आहे. या परंपरेत जावयांना गोडधोड भोजन देऊन सोन्याची अंगठी किंवा अन्य भेटवस्तू देण्याची प्रथा आहे. मात्र, बालेवाडी येथील सामाजिक कार्यकर्ते अनिल बालवडकर यांनी या परंपरेला नवा अनोखा उपक्रम राबविला.
अधिक मासानिमित्त आयोजित केलेल्या कौटुंबिक स्नेहभोजनात त्यांनी आपल्या जावयांसह स्वतःचे सासरे आणि दोन्ही मुलांच्या सासऱ्यांनाही विशेष निमंत्रण देऊन त्यांचा यथोचित सन्मान केला. यावेळी त्यांनी एक महत्त्वपूर्ण सामाजिक संदेश दिला.
याबाबत बोलताना आयोजक आणि भूमाता कार्यकर्ते अनिल बालवडकर म्हणाले, “अधिक मासानिमित्त धोंडा म्हणून समजला जाणाऱ्या या महिन्यात जावयांचा सन्मान केला जातो. त्यांना सोन्याची अंगठी किंवा परिस्थितीनुसार भेट दिली जाते. जावयांचा सन्मान तर नेहमी होतच असतो. एखाद्या मुलाचे किंवा मुलीचे लग्न असेल तर त्या घरातील जावयांना प्रथम विवाह समारंभात सन्मानित केले जाते परंतु जे सासरे म्हणजेच मुलींचे वडील, त्यांना कधी स्टेजवर सन्मानित केलं जात नाही. किंवा त्यांचा सन्मान करण्याचा कुठलाही असा दिवस नाही हे माझ्या मनात वारंवार खटकत होते म्हणूनच आपल्या काळजाचा तुकडा देणाऱ्या पित्यांचा सन्मान व्हावा या हेतूने या कार्यक्रमाचे आयोजन केले होते. आपल्या प्रथा परंपरा जपत असताना मुलींच्या वडिलांनाही सन्मानित करून पुढील पिढीसाठी आदर्श निर्माण व्हावा या हेतूने नियोजन करण्यात आले. कार्यक्रमासाठी आमचे सासरे भानुदास पिंजण, तसेच मोठा मुलगा विराज याचे सासरे तुकाराम लोहोर , लहान मुलगा पैलवान शिवराज याचे सासरे दादा पिंजण, यांच्यासह बालवडकर परिवाराचे ज्येष्ठ जावई सुरेशराव खांदवे, त्याचप्रमाणे सुजित खांदवे, किशोर बोऱ्हाडे, अनिकेत गाडे, पैलवान अनिकेत लांडे , भाचे जावई संदीप बोऱ्हाडे आणि आमचे भाचे गणेश खांदवे या सर्वांचा सपत्नीक असा सन्मान करण्यात आला…”
“सासऱ्यांनी त्यांची मुलगी म्हणजेच त्यांच्या काळजाचा तुकडा आपल्यावर विश्वास ठेवून आयुष्यभरासाठी आपल्या स्वाधीन केलेला असतो. अशा व्यक्तीकडून एखादा धातूचा तुकडा घेण्यापेक्षा त्यांचा सन्मान करणे हे अधिक योग्य आणि कृतज्ञतेचे प्रतीक आहे. त्यांच्या उपकारांची जाणीव ठेवून त्यांना मान देणे हीच खरी संस्कृती आहे.”
या कार्यक्रमात उपस्थित असलेल्या त्यांच्या भाची नीलम बोऱ्हाडे तसेच शिवव्याख्याते राकेश पिंजण यांनी या अभिनव उपक्रमाचे कौतुक करत समाजासाठी हा एक प्रेरणादायी संदेश असल्याचे सांगितले.कौटुंबिक नातेसंबंधांमध्ये परस्पर सन्मान, कृतज्ञता आणि मुलीच्या आई-वडिलांविषयी आदरभाव वाढविणारा हा उपक्रम उपस्थितांच्या विशेष पसंतीस उतरला. अधिक मासाच्या निमित्ताने मुलीच्या वडिलांचा सन्मान करून अनिल बालवडकर यांनी समाजासमोर एक सकारात्मक आणि अनुकरणीय आदर्श निर्माण केला आहे.
“जावयाचा मान राखताना मुलीच्या वडिलांचा, म्हणजे सासऱ्याचाही सन्मान व्हावा,” असा संदेश देणारा हा उपक्रम सध्या सर्वत्र चर्चेचा विषय ठरत आहे.
याप्रसंगी ज्ञानेश्वर लोहोर, रामदास पिंजण, शिवव्याख्याते राकेश पिंजण , राहुल पिंजण, अतुल पिंजण, कुमार लोहोर.. तसेच परिवारातील सर्व सदस्य उपस्थित होते.
