Pune Crime News | हप्ता न दिल्याने रिक्षाचालकासह तिघांवर चाकूने वार करुन जीवे ठार मारण्याचा प्रयत्न, खडकी पोलिसांनी दोघा गुंडांना केली अटक
पुणे : Pune Crime News | हप्ता न दिल्याने तिघा गुंडांनी रिक्षाचालकासह तिघांवर चाकूने वार करुन त्यांना जीवे ठार मारण्याचा प्रयत्न केला. खडकी पोलिसांनी दोघा गुंडांना अटक केली आहे.
निहाल गवळी (वय २०, रा. श्रृती मोहल्ला, खडकी) आणि पृथ्वी पवार ऊर्फ नानू Prithvi Pawar alias Nanu (वय २०, रा. खडकी) अशी अटक केलेल्यांची नावे आहेत. गणेश रास्ते ऊर्फ पिंट्या याच्यावर खुनाचा प्रयत्न केल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत गंगाराम तोटाप्पा गायकवाड (वय ४०, रा. सावित्री विहार, रेंजहिल्स, खडकी) यांनी खडकी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.
या घटनेत गायकवाड व त्यांचे मित्र चंद्रकात बडनेर हे जखमी झाले असून परशुराम चौडाप्पा गायकवाड (वय ३५) यांच्यावर रुग्णालयात उपचार करण्यात येत आहे. ही घटना रेंजहिल्य येथील छोट्या बोगद्याजवळ ७ जून रोजी सायंकाळी ७ वाजता घडला.
पोलिसांनी दिलेल्या महितीनुसार, निहाल गवळी याच्यावर यापूर्वी खुनाचा गुन्हा दाखल आहे. गंगाराम गायकवाड हे रिक्षाचालक आहेत. ते चंद्रकांत बडनेर आणि परशुराम गायकवाड हे रेंजहिल्स येथील छोट्या बोगद्याजवळ गप्पा मारत उभे होते. त्यावेळी निहाल गवळी, पृथ्वी पवार, गणेश रास्ते हे दुचाकीवरुन आले. त्यावेळी पिंट्या याने आवाज दिला की, निहाल भाई हा आपल्याला पैसे देत नाही, त्यावेळी निहाल व पृथ्वी हे खाली उतरले़ निहाल हा फिर्यादीला म्हणाला,‘‘ तुझे पता नही क्या, मै कौन हू, मेरे उपर ३०२, ३०७ के केसेस है, हप्ता नही दिया तो कब कहा तोड डालुंगा पत्ता नाही चलेगा,’’ असे म्हणून धमकी देऊ लागला. त्यावेळी फिर्यादी यांनी पैसे देण्यास नकार दिला. त्यावर पृथ्वी याने ‘‘निहाल भाई इसकी क्या सुन रहा तोड डाल इधरच,’’ असे म्हणताच निहाल याने त्याच्या मागच्या बाजूने चाकू काढून “अब तुझे छोडुंगा नाही,” असे म्हणत फिर्यादी यांच्या डोक्यावर, चेहर्यावर सपासप वार केले. त्यामुळे त्यांच्या डोक्यातून रक्त येऊ लागले. हे पाहून चंद्रकांत व परशुराम हे आडवे आले. त्यावेळी त्यांनी चंद्रकांत याच्यावर हातावर वार केले. परशुराम यांच्या पोटावर, डोक्यावर वारंवार वार केले. त्यामुळे त्यांच्या पोटातून मोठ्या प्रमाणावर रक्त येऊ लागले. तो तिथेच निपचित पडला. त्यावेळी तो मेला असे समजून तिघेही येणार्या जाणार्या लोकांकडे बघून ‘‘हम खडकी के भाई है,’’ असे ओरडून फिर्यादींना म्हणाले, ‘‘अभी हर महिना ५०० रुपये नही दिया तो तेरे घरवालोंको भी नही छोडुंगा,’’ असे म्हणून शिवीगाळ करीत ते निघून गेले. तिघांना रुग्णवाहिकेतून वाय सी एम हॉस्पिटलमध्ये उपचारासाठी नेण्यात आले. खडकी पोलिसांनी दोघांना अटक केली आहे. पोलीस उपनिरीक्षक गाडीलकर तपास करीत आहेत.
